Plane Crash : गुरुवारी संध्याकाळी आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे एसयू-30 एमकेआय लढाऊ विमान कोसळले. साधारण 7.42 ला विमानाचा रडारसोबतचा संपर्क तुटला. त्यानंतर झालेल्या अपघातात दोन्ही पायलटचा मृत्यु झाला. वैमानिकांची ओळख स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर अशी असून ही माहिती हवाई दलाने दिली. बेपत्ता विमानाच्या शोधासाठी तात्काळ सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले. सुखोई हे विमान भारतीय वायुदलातील सर्वात महत्वाचे विमान आहे, त्याचा अपघात झाल्याने खळबळ उडाली. कार्बीच्या 60 किलोमीटरवर ही दुर्घटना घडली. चोकीहोला येथील स्थानिकांनी दावा केला की, जंगलात विमान कोसळले आहे. यानंतर पथक तिथे पोहोचले आणि रात्री उशीरा स्पष्ट झाले की, विमानाचा अपघात झाला आहे. सुखोई-30 हे लढाऊ किमान प्रशिक्षण मोहिमेवर होते. कार्बी आंगलोंग जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशावरून उड्डाण करत असल्याने अचानक विमानावरील नियंत्रण सुटले आणि विमानाचा संपर्कही तुटला. स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा एजन्सींच्या कर्मचाऱ्यांनी विमानाचा शोध घेतला. रात्री उशिरापर्यंत शोध मोहिम सुरू होती. ज्याठिकाणी हे विमान कोसळले त्याठिकाणी घनदाट जंगल आहे. पूर्ण डोंगर आहे, त्यामुळे तिथे पोहोचणे कठीण झाले आणि कोणताही संपर्क होत नव्हता. बचाव पथकासमोर अनेक मोठ्या समस्या होत्या. भारतीय हवाई दलाने या अपघातानंतर दु:ख व्यक्त केले. यासोबतच आम्ही या वाईट काळात कुटुंबियांच्यासोबत असल्याचे म्हटले. एसयु-30एमकेआय हे रशियन विमान उत्पादक सुखोईने विकसित केलेले लढाऊ विमान आहे. आता भारतीय हवाई दलासाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे परवान्याअंतर्गत तयार केले जाते. या विमानाच्या अपघाताने मोठी खळबळ उडाली. कारण हे विमान भारतीय हवाई दलातील प्रमुख आहे.