Pune News : वैभवशाली मिरवणुकीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला भावपूर्ण निरोप
Pune News : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला शनिवारी पहाटे ४ वाजून १ मिनिटांनी पांचाळेश्वर घाटावरील हौदात भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.

Pune News : आकर्षक कलाकुसरीने सजावलेला विघ्नहर्ता बाप्पाचा रथ, त्यावर कोल्ड फायरची विद्युत रोषणाई, मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी होणारी पुष्पवृष्टी, ढोल ताशांचा गजर आणि मोरया मोरयाचा जयघोष अशा वैभवशाली दिमाखदार मिरवणुकीने हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला शनिवारी पहाटे चार वाजता भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. यावेळी हजारो भाविक विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर बाप्पाच्या दर्शनासाठी उपस्थित होते. (Pune News)
अनंत चतुर्दशीला म्हणजेच शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे आणि पोलिस उपायुक्त कृषिकेश रावळे यांच्या हस्ते बाप्पाची पूजा-आरती झाली. त्यानंतर सकाळी आठ वाजता श्री गणेश सुवर्णधाम मंदिरातून बाप्पा विराजमान झालेला ‘श्री विघ्नहर्ता रथ’ विसर्जन मिरवणुकीसाठी मंडईतील टिळक पुतळ्याकडे मार्गस्थ झाला. टिळक पुतळा येथे प्रथा परंपरेनुसार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टकडून उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांच्या हस्ते मानाच्या पाचही गणपतींना पुष्पहार अर्पण करण्यात आला. (Pune News)
त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या प्रत्यक्ष विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी ‘श्री विघ्नहर्ता रथाचे सारथ्य केले. रात्री पावणे दहा वाजता बेलबाग चौकात रंगारी बाप्पाच्या रथाचे आगमन झाले. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा पुतळा आणि त्यावर नगारा मिरवणुकीत पुढे होते.
त्यापाठोपाठ शिवयोद्धा मर्दानी आखाडाकडून चित्त थरारक मर्दानी खेळांचे सादरीकरण केले जात होते. यावेळी युवा वाद्य पथक, श्रीराम आणि रमणबाग यांच्या ढोल पथकांच्या वादनाने मिरवणुकीचा उत्साह वाढवला. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून विघ्नहर्ता रथावर पुष्पवृष्टी केली जात होती, तर रथावर कोल्ड फायरच्या होणाऱ्या विद्युत आतषबाजीमुळे ही मिरवणूक भक्तांच्या डोळांचे पारणे फेडणारी अशीच ठरली. (Pune News)
पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास ‘श्री विघ्नहर्ता रथा’चे टिळक चौकात आगमन झाले. यावेळी रंगारी बाप्पाच्या दर्शनासाठी उपस्थित असलेल्या हजारो भाविकांनी मोरया मोरयाचा एकच जयघोष केला. अप्पर पोलीस आयुक्त तेजस्विनी सातपुते यांच्या हस्ते बाप्पांची आरती झाली आणि बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ झाले. पहाटे ४ वाजून १ मिनिटांनी पांचाळेश्वर विसर्जन घाटावर महापालिकेच्या हौदात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला भक्तीभावाने भावपूर्ण निरोप देण्यात आला.
“श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट च्या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक दरवर्षीप्रमाणे यंदाही जल्लोषात आणि उत्साहात पार पडली. पोलिस प्रशासनाने दिलेल्या वेळेला विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आम्ही तयार होतो, मात्र, काही कारणास्तव उशीर झाला. पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर लक्ष्मी रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालो. कमीत कमी वेळेत मिरवणूक संपविण्याचा प्रयत्न केला. (Pune News)
आता बाप्पाला निरोप दिल्यानंतर निश्चितच दुःख होतंय. मात्र, पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी नवीन कल्पना घेऊन आम्ही लगेचच तयारीला सुरवात करणार आहोत. हा संपूर्ण गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेने पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासन, महापालिका, मंडळाचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते यांनी केलेल्या सहकार्याबद्दल या सर्वांचे मनःपूर्वक आभार!’’
पुनीत बालन
(उत्सवप्रमुख व विश्वस्त श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट)






