‘तुमच्या बाब्याने 2 आमदारांचा बळी घेतला’, खा. श्रीकांत शिंदेचा ठाकरेंवर पलटवार

अमरावती : काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचं कार्ट म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेला आता श्रीकांत शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण अजूनही काही लोकांची भाषाच सुधारली नाही, असा टोलादेखील श्रीकांत शिंदेनी यावेळी लगावला.
काय म्हणाले खा. श्रीकांत शिंदे?
‘एक म्हण आहे, आपलं पोरगं बाब्या, दुसऱ्याचं पोरगं कार्ट, आपल्या बाब्याने 2-2 आमदारांचा बळी घेतला आहे. मी जनतेतून निवडून आलो आहे, फाईट करून निवडून आलो आहे. लोकसभेमध्ये कल्याण चॅलेंज केलं होतं, पण ते पळून गेले. निवडणूक लढले नाही. जनतेने त्यांना लोकसभेमध्ये जागा दाखवून दिली. काँग्रेसच्या मतांवर यांच्या जागा निवडून आल्या. येणाऱ्या काळात यांची परिस्थिती ना घर का ना घाट का अशी करून ठेवेल’, असं प्रत्युत्तर श्रीकांत शिंदे यांनी दिलं आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
लोकसभेत मुख्यमंत्र्यांचं कार्ट समोर होतं, प्रचंड पैसे ओतले, हेराफेरी केली. सगळी यंत्रणा वापरली. एका साध्या शिवसेना कार्यकर्तीला पाडण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना तिकडे यावं लागलं, तरीही 4 लाख मतं आपल्या उमेदवाराला मिळाली, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंवर जोरदार टीका केली.





