Ozar News : विघ्नहर कारखान्याच्या ४१व्या गळीत हंगामासाठी बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न
Ozar News : जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ या ४१ व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन शनिवारी (२६ सप्टेंबर २०२६) निवृत्तीनगर येथे मोठ्या उत्साहात पार पडले.

Ozar News : जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ या ४१व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन शनिवारी (२६ सप्टेंबर) सकाळी १० वाजता निवृत्तीनगर येथे पार पडले. कारखान्याचे संचालक बाळासाहेब पांडुरंग घुले व त्यांच्या पत्नी वंदनाताई घुले यांच्या हस्ते हा विधी करण्यात आला. यावेळी चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. (Ozar News)
गळीत हंगामासाठी कारखान्यातील सर्व मशिनरीच्या देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्ण झाली असून कारखाना गाळपासाठी सज्ज झाला आहे. यंदा गळीत हंगाम नेहमीपेक्षा लवकर सुरू होणार असला, तरी कमी पावसामुळे उसाची वाढ कमी झाली आहे. तसेच हुमणी किडीच्या प्रादुर्भावामुळे एकरी ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखाना या दोघांनाही आर्थिक फटका बसण्याची शक्यता असल्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी सांगितले. (Ozar News)
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यंदाचा गळीत हंगाम १५ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. विघ्नहर कारखान्याने १० लाख मे. टनांपेक्षा अधिक ऊस गाळपाचे नियोजन केले असून, ऊस तोडणी व वाहतुकीसाठी विविध यंत्रणांशी करार करण्यात आले आहेत. (Ozar News)
दरम्यान, कारखान्याचे आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता ५ हजार मे. टनांवरून ७ हजार ५०० मे. टन झाली आहे. आगामी हंगामात दररोज ८ हजार ते ८ हजार ५०० मे. टन ऊस गाळप करण्याचे नियोजन आहे. को-जनरेशन प्रकल्पही पूर्ण क्षमतेने चालविण्यात येणार आहे. (Ozar News)
ऊस उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी कारखान्याच्या ऊस विकास विभागाचे मार्गदर्शन घ्यावे, तसेच कारखान्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या खते व इतर सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी केले. आगामी गळीत हंगामात ऊस उत्पादकांनी विघ्नहर कारखान्यास जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी देऊन सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले. (Ozar News)
यावेळी व्हाईस चेअरमन अशोक घोलप, सुमित्राताई शेरकर, कार्यकारी संचालक भास्कर घुले यांच्यासह संचालक, अधिकारी, कामगार युनियन, सेवक पतसंस्था, सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (Ozar News)





