श्री वाल्मीकी यात्रेला उद्यापासून सुरुवात; यात्रेची जय्यत तयारी

ढेबेवाडी : वाल्मीकी ऋषींची तपोभूमी व घनदाट जंगलाच्या सानिध्यात असलेल्या श्री वाल्मीकी यात्रेला सोमवारपासून (दि. २४) सुरुवात होत आहे. महाशिवरात्रीला २६ फेब्रुवारी रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे. यात्रेसाठी सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतून भाविक मोठ्या संख्येने येतात. वाल्मीकी देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत पानेरी (ता. पाटण) व ग्रामस्थांकडून यात्रेची जय्यत तयारी सुरु आहे.
पाटण तालुक्यातील वाल्मीक हे निसर्गरम्य ठिकाण आहे. समृद्ध वनसंपदेने नटलेल्या या परिसराला मोठे धार्मिक महत्त्व असल्याने प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीला भाविक मोठी गर्दी करतात. अलीकडच्या काळात वाल्मीक हे निसर्ग पर्यटन केंद्र म्हणून उदयास येऊ लागले आहे. या ठिकाणी पर्यटक व निसर्गप्रेमींची सतत वर्दळ असते. सुरुवातीस वाहतुकीची सुविधा नसल्याने भाविक पायी चालत यायचे.
आता रस्ते झाल्याने मंदिरापर्यंत वाहतूक सुरु असते. महाशिवरात्री दिवशी बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस असून यात्रेसाठी भाविक खासगी वाहनांनी येतात. त्याशिवाय दिवसभर एसटी बसची वाहतूक सुरू असते. यात्रेत भजन, कीर्तन व भारुड असे प्रबोधनात्मक कार्यक्रम होतात, हे या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. त्यामुळे या यात्रेला विषेश महत्व आहे. सोमवारी दि. 24 रोजी यात्रेला प्रारंभ होत आहे. पहिल्या दिवशी दिवसभर व रात्री हरिनाम जप, दुसऱ्या दिवशी पालखी मिरवणूक, आरती, दहिकाला दहिहंडी असे कार्यक्रम होणार आहेत.





