Shri Sevagiri Maharaj Palkhi: पुसेगावातून सेवागिरी महाराजांची पालखी पंढरीकडे रवाना; भाविकांची अलोट गर्दी
Shri Sevagiri Maharaj Palkhi: छत्रपती शिवाजी चौकात वारकऱ्यांचे गोल रिंगण, लेझीम आणि बँडपथकांच्या निनादात पुसेगावसह परिसरातील हजारो भाविकांची अलोट गर्दी.

Shri Sevagiri Maharaj Palkhi – श्री सेवागिरी महाराजांची श्री क्षेत्र पुसेगाव- पंढरपूर पायी पालखी दिडी सोहळ्याचे पंढरपूरकडे आज दि. १६ रोजी सकाळी १०.१५ वाजता प्रस्थान झाले. अत्यंत भावपूर्ण वातावरणात ग्रामस्थांनी येथील शासकीय विद्यानिकेतन येथे या सोहळ्याला निरोप दिला. येथील श्री सेवागिरी महाराज ट्रस्टतर्फे यावर्षीही पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य श्री सुंदरगिरी महाराज, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रियाताई शिंदे यांनी आज सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास पालखी, श्री सेवागिरी महाराज, संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे व श्री सेवागिरींच्या पादुकांचे पालखी दिंडी रथाचे विधीवत पूजन केले. यावेळी सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष वाघ, डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, संतोष उर्फ बाळासाहेब जाधव,
सचिन देशमुख, गौरव जाधव, सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, प्रशासक विशाल जाधव, सचिव विशाल माने, माजी चेअरमन व विश्वस्त, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे पदाधिकारी, विविध मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. श्री सेवागिरी मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर पायी दिंडी सोहळ्यातील फुलांच्या माळांनी सजविलेला दिडी रथ पुसेगाव बाजारपेठेतून मिरवणुकीने एस. टी. बस स्थानकाजवळ शिवाजी चौकात आला.
यावेळी रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या असलेल्या भाविक व ग्रामस्थानी पालखी रथाचे प्रतिमेचे मनोभावे दर्शन घेतले. शिवाजी चौकात वारकऱ्यांनी ज्ञानोबा- तुकाराम महाराज, श्री सेवागिरी महाराजांचा जयघोष, अभंगच्या तालावर वारकरी भक्तीरसाच्या वातावरणात न्हाऊन गेले होते. देहभान विसरुन सर्व वारकरी सेवागिरी, विठूनामाच्या गजर करीत नाचत होते. यावेळी वारकरी महिला व पुरुषांनी फुगड्या खेळल्या.
‘श्री सेवागिरी महाराज की जय’च्या जयघोषात, अभंग, ढोल- ताशा, लेझीम, बँडपथक, तुतारी व झांजपथक यांच्या निनादात मोठ्या भक्तमय व उत्साही वातावरणात श्री सेवागिरी पालखीस सुरुवात झाली. खऱ्या अर्थाने वैष्णवांचा मेळा रंगू लागला. त्यावेळचे वातावरण सेवागिरीमय झाले होते. परिसर, विठोबा माऊली, ज्ञानेश्वर माऊली सेवागिरी महाराज की जय याने दुमदुमला होता.
पुसेगाव येथील छत्रपती शिवाजी चौकात वारकऱ्यांच्या फुगड्या, गोल रिंगण, पारंपरिक खेळ सादर करण्यात आले. या वातावरणावर उपस्थितांनी ठेका धरला. कपाळी वैष्णवांचा टिळा, बुका, डोक्यावर तुळशी, डोईवर पागोटे, हातात टाळ, मृदंग, वीणा आणि मुखावरचा भाव असा पुसेगावसह पवारवाडी, खातगुण, बुध, आदी भागातील हजारो वारकऱ्यांचा मेळा पुसेगावात झाला.





