Pune : 12 ऑक्टोबरला सारसबागेतील श्री महालक्ष्मी मंदिरात भव्य श्रीसूक्त पठण; पुणेकरांना सहभागी होण्याचे आवाहन
Pune : सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिरात १२ ऑक्टोबरला सकाळी ६ वाजता सामूहिक श्रीसूक्त पठण सोहळा होणार असून पुणेकर भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Pune : सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिरात सार्वजनिक नवरात्रोत्सव २०२६ निमित्त सोमवार, १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता भव्य सामूहिक श्रीसूक्त पठण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात पुणे शहरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंदिराच्या विश्वस्त मंडळाने केले आहे.
श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि श्री महासरस्वती या आदिशक्तीच्या त्रिदेवी स्वरूपाचे या मंदिराला अधिष्ठान मानले जाते. नवरात्रोत्सवाच्या काळात देवीची आराधना आणि भक्तीचे वातावरण निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
श्रीसूक्त हे श्री महालक्ष्मी देवीच्या स्तुतीसाठीचे पवित्र वैदिक स्तोत्र आहे. सुख, समृद्धी, शांती आणि कल्याणासाठी देवीची उपासना करताना श्रीसूक्त पठणाला विशेष महत्त्व आहे. सामूहिक पठणातून भक्ती आणि मंगलभावनेचा संदेश देण्याचा आयोजकांचा उद्देश आहे.
या कार्यक्रमासाठी पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. श्री महालक्ष्मी मंदिरात ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. या काळात विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.





