Shreyas Iyer Comeback : न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेआधी टीम इंडियात मोठे बदल! श्रेयस अय्यरची २ वर्षांनंतर वापसी

Shreyas Iyer Comeback in T20I Squad : न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या टी-२० मालिकेपूर्वी भारतीय संघात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) जखमी खेळाडूंच्या जागी दोन अनुभवी खेळाडूंच्या नावांची घोषणा केली आहे. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर आणि फलंदाज तिलक वर्मा दुखापतीमुळे बाहेर पडले असून, त्यांच्या जागी श्रेयस अय्यर आणि रवी बिश्नोई यांना संधी देण्यात आली आहे.
वॉशिंग्टन सुंदर आणि तिलक वर्मा जखमी –
११ जानेवारी रोजी वडोदरा येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात गोलंदाजी करताना वॉशिंग्टन सुंदरच्या बरगड्यांच्या खालच्या भागात स्नायू दुखू लागले होते. स्कॅनिंगमध्ये त्याला ‘साईड स्ट्रेन’ (Side Strain) झाल्याचे स्पष्ट झाले असून, डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. दुसरीकडे, तिलक वर्मा देखील दुखापतीमुळे पहिल्या तीन सामन्यांना मुकणार आहे.
श्रेयस अय्यरची २ वर्षांनंतर टी-२० मध्ये वापसी –
या मालिकेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे स्टार फलंदाज श्रेयस अय्यरचे पुनरागमन. श्रेयसने आपला शेवटचा टी-२० सामना डिसेंबर २०२३ मध्ये खेळला होता. तब्बल दोन वर्षांनंतर तो या फॉरमॅटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसेल. त्याला पहिल्या तीन सामन्यांसाठी संघात स्थान मिळाले आहे. तसेच, फिरकीपटू रवी बिश्नोई देखील फेब्रुवारी २०२५ नंतर प्रथमच टी-२० संघात परतला आहे.
न्यूझीलंड मालिकेसाठी सुधारित भारतीय संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (पहिल्या तीन टी-२० साठी), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, ईशान किशन (यष्टीरक्षक), रवी बिश्नोई.





