Shreyas Iyer Injury : श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट आली समोर; मैदानात कधी परतणार? जाणून घ्या

Shreyas Iyer Injury Updates : भारतीय क्रिकेट संघाचा मधल्या फळीतील स्फोटक फलंदाज श्रेयस अय्यर सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. मात्र, क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. श्रेयस अय्यरच्या फिटनेसबाबत एक मोठे अपडेट मिळाले असून, तो वेगाने बरा होत असल्याची माहिती समोर आली आहे.
फिटनेसमध्ये सुधारणा; बॅटिंग सराव सुरू
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वन-डे सामन्यादरम्यान श्रेयसच्या बरगडीला गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले होते. मात्र, आता तो यातून सावरत आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, २४ डिसेंबर रोजी मुंबईत श्रेयसने फलंदाजीचा सराव केला. विशेष म्हणजे, फलंदाजी करताना त्याला कोणताही त्रास जाणवला नाही.
पुढील तपासाणीठी आणि पूर्ण फिटनेसबद्दल खात्री करण्यासाठी श्रेयसला आता बेंगळुरू येथील बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ (COE) मध्ये पाठवण्यात आले आहे. तिथे वैद्यकीय पथक त्याच्या हालचालींवर आणि फिटनेसवर ४ ते ६ दिवस बारीक लक्ष ठेवणार आहे.
विजय हजारे ट्रॉफीद्वारे पुनरागमनाची शक्यता –
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेयस सध्या नियमितपणे जिममध्ये ट्रेनिंग करत आहे. त्याची दुखापत आता चिंतेचा विषय नाही. श्रेयसची स्वतःची अशी इच्छा आहे की, त्याने विजय हजारे ट्रॉफी खेळून आपली मॅच फिटनेस सिद्ध करावी. मात्र, बीसीसीआय खेळाडूंच्या बाबतीत घाई करण्याच्या विचारात नसून, पूर्ण खात्री पटल्यानंतरच त्याला ग्रीन सिग्नल दिला जाईल.
हेही वाचा – Boxing Day Test : बॉक्सिंग डे टेस्ट म्हणजे काय? ही कसोटी कधी आणि का खेळली जाते? जाणून घ्या इतिहास
न्यूझीलंडविरुद्ध पुनरागमनाची शक्यता –
श्रेयस अय्यरला २५ ऑक्टोबर रोजी सिडनी येथे क्षेत्ररक्षण करताना ही दुखापत झाली होती. आता त्याचे मुख्य लक्ष्य ११ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेवर आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड ३ किंवा ४ जानेवारीच्या सुमारास होण्याची शक्यता आहे. जर श्रेयसने तोपर्यंत फिटनेस चाचणी यशस्वीरीत्या पार पाडली, तर न्यूझीलंडविरुद्ध तो पुन्हा भारतीय जर्सीमध्ये मैदानात दिसेल.





