What Is Boxing Day Test : जागतिक क्रिकेटमध्ये २६ डिसेंबर हा दिवस ‘बॉक्सिंग-डे’ (Boxing Day) म्हणून ओळखला जातो. ऑस्ट्रेलियामध्ये ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी सुरू होणारा हा कसोटी सामना केवळ एक खेळ नसून ऑस्ट्रेलियन क्रिकेट परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे. या ऐतिहासिक सामन्यामागील इतिहास आणि ऑस्ट्रेलियाचे या मैदानावरील वर्चस्व अत्यंत रंजक आहे. ‘बॉक्सिंग-डे’ म्हणजे नक्की काय? ख्रिसमसच्या काळात ऑस्ट्रेलियात सुट्ट्यांचे वातावरण असते. ख्रिश्चन धर्मातील परंपरेनुसार, ख्रिसमसच्या दिवशी लोक एकमेकांना भेटवस्तू (Gifts) देतात. या भेटवस्तूंचे बॉक्स ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २६ डिसेंबरला उघडले जातात, म्हणूनच या दिवसाला ‘बॉक्सिंग-डे’ असे संबोधले जाते. याच खास मुहूर्तावर दरवर्षी कसोटी सामन्याला सुरुवात होते. क्रिकेटमधील एन्ट्री आणि इतिहास – क्रिकेटमध्ये ‘बॉक्सिंग-डे’ शब्दाची एन्ट्री १८९२ मध्ये ऑस्ट्रेलियातील एका स्थानिक हंगामादरम्यान झाली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिला बॉक्सिंग-डे कसोटी सामना १९५० मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला. मात्र, १९७४-७५ च्या ॲशेस मालिकेपासून ही परंपरा अधिकृतपणे सुरू झाली. तेव्हापासून दरवर्षी २६ डिसेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) हा सामना खेळला जातो. या मैदानाची निवड करण्यामागे येथील प्रेक्षक क्षमता हे मोठे कारण आहे; तब्बल एक लाख लोक एकत्र बसून या सामन्याचा आनंद घेऊ शकतात. हेही वाचा – Ravi Shastri : अॅशेस मालिकेतील पराभवानंतर ‘बॅझबॉल’चा अंत जवळ; रवी शास्त्री होणार इंग्लंडचे नवे कोच? मेलबर्नवर ऑस्ट्रेलियाचे निर्विवाद वर्चस्व – बॉक्सिंग-डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा रेकॉर्ड अत्यंत जबरदस्त आहे. एकूण कामगिरी: मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत ११७ सामने खेळले असून त्यापैकी ६८ सामन्यांत विजय मिळवला आहे, तर ३२ सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. २००० नंतरचा विक्रम: वर्ष २००० पासून ऑस्ट्रेलियाने येथे खेळलेल्या २५ सामन्यांपैकी १९ सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे, या काळात ऑस्ट्रेलियाला येथे फक्त ४ पराभव स्वीकारावे लागले, ज्यापैकी दोन वेळा भारतीय संघाने त्यांना पराभवाची धूळ चारली आहे. बॉक्सिंग-डे कसोटी हा केवळ ऑस्ट्रेलियासाठीच नव्हे, तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी एक उत्सव असतो, ज्याची उत्सुकता आजही कायम आहे.