Shreyanka Patil Injury : टीम इंडियाच्या विजयाला गालबोट! श्रेयंका पाटील गंभीर जखमी; भर मैदानातून स्ट्रेचरवरून नेण्याची आली वेळ
Shreyanka Patil Injury : या सामन्यात भारतीय संघाने २१० धावांचे लक्ष्य ठेवले होते, प्रत्युत्तरात नेदरलँड्सचा संघ ११४ धावांवर गारद झाला.

Shreyanka Patil Injury IND W vs NED W Match : महिला टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत नेदरलँड्सविरुद्ध ऐतिहासिक धावसंख्या उभारून विजयाचा जल्लोष साजरा करणाऱ्या भारतीय छावणीतून एक अत्यंत चिंताजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारताची स्टार युवा फिरकीपटू श्रेयंका पाटील सामन्यादरम्यान गंभीररीत्या जखमी झाली आहे. तिची दुखापत इतकी गंभीर होती की तिला स्वतःच्या पायावर उभे राहता आले नाही आणि तिला थेट स्ट्रेचरवर झोपवून मैदानाबाहेर न्यावे लागले. या घटनेमुळे कर्णधार हरमनप्रीत कौर आणि भारतीय चाहत्यांचे टेन्शन वाढले आहे.
मैदानात नेमकं काय घडलं?
हा दुर्दैवी अपघात नेदरलँड्सच्या डावातील ६ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर घडला. श्रेयंका पाटील स्वतः गोलंदाजी करत होती आणि स्ट्राइकवर डच फलंदाज मोल्केनबोअर उभी होती. श्रेयंकाने टाकलेल्या चेंडूवर फलंदाजाने मिड-ऑनच्या दिशेने शॉट खेळला. तो चेंडू अडवण्यासाठी श्रेयंका वेगाने धावली. मात्र, धावताना खेळपट्टीवर तिचा पाय चुकीच्या पद्धतीने लँड झाला आणि ती घसरली. अचानक संतुलन बिघडल्यामुळे तिचा पाय अत्यंत वाईट रितीने मुडला आणि ती तीव्र वेदनेने थेट मैदानावरच कोसळली.
स्ट्रेचर मागवावे लागले; जुन्या दुखापतीचा इतिहास –
Get well soon, Shreyanka Patil!
[ICC, WomensT20WorldCup] pic.twitter.com/OOrZhTVLG0
— Maitreyanath (@Maitreyanath) June 17, 2026
श्रेयंकाला असह्य वेदनेने विव्हळताना पाहून पंच आणि सहकाऱ्यांनी तात्काळ फिजियोला मैदानावर बोलावले. सुरुवातीच्या तपासणीतच ती उभी राहू शकत नसल्याचे स्पष्ट झाल्यावर मैदानावर वैद्यकीय गाडी आणि स्ट्रेचर मागवण्यात आले. श्रेयंकाला स्ट्रेचरवर झोपवून मैदानाबाहेर नेण्यात आले, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर वेदना आणि निराशा स्पष्ट दिसत होती.
श्रेयंकाचा दुखापतींचा इतिहास जुना आहे. यापूर्वी २०२४ च्या आशिया चषक स्पर्धेत तिच्या बोटाला गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे ती तब्बल १४ महिने क्रिकेटपासून दूर होती. याशिवाय तिला अंगठ्याचे फ्रॅक्चर आणि दोन्ही पायांच्या पिंड्यांच्या त्रासाचा सामना करावा लागला होता. आता पुन्हा विश्वचषकाच्या ऐन मध्यभागात ती जखमी झाल्यामुळे भारतीय संघाच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.





