Navratri Festival 2026 : श्री महालक्ष्मी मंदिराचा सार्वजनिक नवरात्रोत्सव 11 ऑक्टोबरपासून
Navratri Festival 2026 : सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिराचा सार्वजनिक नवरात्रोत्सव ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान होणार. २ किलो सोन्याचा मुकुट, महिला सन्मान, अष्टलक्ष्मी मिरवणूक आणि रावणदहन होणार.

Navratri Festival 2026 : श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागच्या वतीने यंदाचा सार्वजनिक नवरात्रोत्सव रविवार, ११ ऑक्टोबर ते मंगळवार, २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत साजरा होणार आहे. धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान तसेच त्यांच्या हस्ते आरतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंदिर ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रविवार, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता श्रीकांत बडवे आणि सुप्रिया बडवे यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. सायंकाळी ६ वाजता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन होईल. यंदाची सजावट ‘शृंगार’ या संकल्पनेवर आधारित असून, मंदिराचे प्रवेशद्वारही त्याच धर्तीवर सजवण्यात येणार आहे.
देवीला २ किलो वजनाचा सोन्याचा मुकुट
घटस्थापनेच्या दिवशी श्री महालक्ष्मी देवीला २ किलो वजनाचा नवीन सोन्याचा मुकुट परिधान करण्यात येणार आहे. आकर्षक नक्षीकाम आणि कलाकुसर असलेल्या या मुकुटामुळे देवीचे विशेष रूप भाविकांना पाहता येणार आहे. दहा दिवसांत अभिषेक, याग आणि महाआरतीसह विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
महिलांचा दररोज सन्मान
१२ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता सामूहिक श्रीसूक्त पठण होणार आहे. यात महिला आणि पुरुष भाविक सहभागी होणार आहेत. महापौर मंजुषा नागपुरे यावेळी उपस्थित राहणार आहेत.
१२ ऑक्टोबरपासून दररोज सायंकाळी ५ वाजता विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जाणार आहे. यामध्ये महिला शेतकरी व कृषी उद्योजिका, शास्त्रज्ञ, पोलीस अधिकारी, वैमानिक, जिल्हाधिकारी, मानव संसाधन व्यवस्थापक, महिला उद्योजिका आणि अन्य क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा समावेश आहे.
अष्टलक्ष्मी मिरवणूक आणि जिवंत देखावा
१३ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजता अष्टलक्ष्मीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. १५ ऑक्टोबर रोजी ललिता पंचमीनिमित्त दुपारी ३.३० वाजता कन्यापूजन होईल. १६ ऑक्टोबर रोजी ‘गाथा शिवशंभूंची’ हा जिवंत देखावा सादर केला जाणार आहे.
उत्सवात रक्तदान व आरोग्य शिबिर, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, ढोल-ताशा वादनसेवा, नृत्यातून देवी आराधना, बँजो वादन आणि माता की चौकी असे उपक्रमही होणार आहेत. १९ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजता मंदिरासमोर सामूहिक गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दसऱ्याला सोन्याची साडी, रात्री रावणदहन
२० ऑक्टोबर रोजी दसऱ्यानिमित्त श्री महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी परिधान करण्यात येणार आहे. रात्री ९.३० वाजता भव्य रावणदहन होईल. विश्वकर्मा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी रावणाची प्रतिकृती तयार केली आहे.
भाविकांच्या सुरक्षेसाठी ५ कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला आहे. मंदिर परिसरात ५० सीसीटीव्ही कॅमेरे आणि ५० हून अधिक सुरक्षारक्षक तैनात असणार आहेत. उत्सवात पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंदिर ट्रस्टने केले आहे.





