पुणे जिल्हा | श्री छत्रपती कारखाना करणार 10 लाख टन ऊस गाळप

भवानीनगर, (वार्ताहर)- येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यात मिल रोलरचे पूजन कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्ष प्रशांत काटे यांनी सांगितले की, येत्या गळीत हंगामाकरिता कारखान्याचे कार्यक्षेत्रात अंदाजे 8 लाख मे. टन ऊस गळितास उपलब्ध आहे. कार्यक्षेत्राबाहेरील गेटकेनचा 2 लाख मे. टन ऊस गळितास घेऊन 10 लाख मे. टन ऊस गाळप करण्याचे संचालक मंडळाने ठरविले आहे. त्या दृष्टीने ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा भरती करणेचे काम चालू आहे.
आत्तापर्यंत 386 ट्रॅक्टरचे, 1, 110 बैलगाडीचे व 568 ट्रॅक्टरगाडीचे करार पूर्ण झाले आहेत. या वर्षी वाहनांचे करार करणेसाठी वाहतूक कंत्राटदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असून 10,000 मे. टनाची यंत्रणा भरती करण्यात येणार आहे. तसेच सध्या कारखान्यातील मशिनरी ओव्हरहॉलिंग व रिपेअरिंगची कामे चालू असून ही कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करून माहे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात दोन्ही प्लॅन्ट गाळपासाठी सज्ज ठेवण्यात येणार आहेत.
येत्या हंगामाकरिता असलेली उसाची उपलब्धता विचारात घेता दोन्ही प्लॅन्ट पूर्ण क्षमतेने चालविणेत येणार आहेत. या वर्षी कारखान्याचे कार्यक्षेत्रात पावसाने वेळेवर आणि चांगली सुरुवात केली असलेने उसाच्या उपलब्धतेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
मागील हंगामात सभासदांनी व गेटकेन ऊस उत्पादकांनी त्यांचा ऊस कारखान्यास गळितास देऊन सहकार्य केले आहे. तसेच ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार, तोडणी मजूर, अधिकारी व कर्मचारी यांनी चांगले सहकार्य केल्यामुळे आपल्याला 7 लाख 29 हजार 581 मे. टन उसाचे गाळप करणे शक्य झाले. अशाच प्रकारे येणारा गळीत हंगाम यशस्वी करणेसाठी सर्वांनी चांगले सहकार्य करावे व सभासदांनी त्यांचा ऊस आपल्याच कारखान्यास गळितास देऊन सहकार्य करावे.
या कार्यकमास संचालक बाळासाहेब पाटील, राजेंद्र गावडे, संतोष ढवाण, रसिक सरक, निवृत्ती सोनवणे, कुंदन देवकाते, तसेच माजी संचालक भाऊसाहेब सपकळ, कार्यकारी संचालक अशोक जाधव, वर्क्स मॅनेजर प्रसाद राक्षे, फायनान्स मॅनेजर हनुमंत करवर, मुख्य शेतकी अधिकारी जालिंदर शिंदे,
सिव्हिल इंजिनिअर तानाजी खराडे, डेप्युटी चीफ् इंजिनिअर अण्णासाहेब कदम, सुरक्षा अधिकारी दत्तात्रय पिसे, परचेस ऑफिसर विरेंद्र वाबळे, शुगर वर्कर्स युनियनचे अध्यक्ष युवराज रणवरे, सतीश गावडे, नंदकुमार चांदगुडे, गजानन कदम, सुहास निंबाळकर तसेच कर्मचारी उपस्थित होते.





