Shree Charani Record : श्री चरणीने फायनलमध्ये ४ विकेट्स घेत रचला इतिहास! एका वर्षात ‘हा’ खास पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
Shree Charani Record : श्री चरणीने श्रीलंकेविरुद्ध आशिया कपच्या अंतिम सामन्यात चार विकेट्स घेऊन इतिहास रचला. नेमका काय आहे तो रेकॉर्ड जाणून घेऊया.

Shree Charani 39 Wickets Record Breaks Poonam Yadav Most T20I Wickets Women Asia Cup Final : भारतीय महिला क्रिकेट संघाची युवा फिरकीपटू श्री चरणी हिने १३ सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्धच्या आशिया चषक अंतिम सामन्यात नवा इतिहास रचला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या महामुकाबल्यात तिने ३६ वी विकेट्स घेताच महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच वर्षात (कॅलेंडर इयर) सर्वाधिक विकेट्स घेणारी पहिली भारतीय गोलंदाज बनण्याचा बहुमान पटकावला. या सामन्यात चरणीने अवघ्या २० धावांत ४ विकेट्स टिपून भारताच्या ऐतिहासिक विजयाचा पाया रचला.
हर्षिता समरविक्रमाची विकेट ठरली टर्निंग पॉईंट; १६ व्या षटकात उडवला थरार!
श्रीलंकेची प्रमुख फलंदाज हर्षिता समरविक्रमाला स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद करत चरणीने ऐतिहासिक ३६ वी विकेट्स नोंदवली. त्यानंतर तिने सामन्याच्या १६ व्या षटकात एकापाठोपाठ दोन धक्के देत श्रीलंकेच्या मधल्या फळीचे कंबरडे मोडले. यामुळे श्रीलंकेची अवस्था ४ बाद ८६ वरून ६ बाद १०१ अशी बिकट झाली. यानंतर संपूर्ण लंकन संघ अवघ्या १११ धावांत गारद झाला आणि भारताने ७२ धावांनी विजय मिळवत विक्रमी आठव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले.
पूनम यादवचा ३५ विकेट्स विक्रम मोडला; चरणीच्या खात्यात ३९ विकेट्स!
MOST T20I WICKETS FOR INDIA WOMEN IN A CALENDAR YEAR 🇮🇳
39 — Shree Charani (2026)*
35 — Poonam Yadav (2018)
30 — Deepti Sharma (2024)
30 — Deepti Sharma (2026)*
29 — Deepti Sharma (2022)
29 — Radha Yadav (2024)
Shree Charani creates a new Indian record with 39 T20I… pic.twitter.com/uLj6HNO4kk
— CricInformer (@CricInformer) September 14, 2026
या ऐतिहासिक कामगिरीसह श्री चरणीच्या खात्यात २०२६ या वर्षात आतापर्यंत एकूण ३९ आंतरराष्ट्रीय टी-२० विकेट्स जमा झाले आहेत. यापूर्वी हा विक्रम लेगस्पिनर पूनम यादवच्या नावावर होता, जिने २०१८ मध्ये ३५ विकेट्स मिळवले होते. आता एका वर्षात सर्वाधिक टी-२० विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये श्री चरणी (३९) अव्वल स्थानी पोहोचली असून तिच्यामागे पूनम यादव (३५) आणि दीप्ति शर्मा (३०) यांचा क्रमांक लागतो.
१८४ धावांच्या लक्ष्यापुढे श्रीलंका निष्प्रभ; भारताचा ७२ धावांनी दणदणीत विजय!
विजयासाठी १८४ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या चमारी अटापट्टू आणि विश्मी गुणारत्ने यांनी ५८ धावांची भागीदारी केली होती. मात्र, १० व्या षटकात दीप्ती शर्माने ही जोडी फोडल्यानंतर श्री चरणीच्या फिरकीचे वादळ घोंघावले. चरणीने २० धावांत ४ तर दीप्ती शर्माने १५ धावांत २ विकेट्स टिपले. भारताच्या शिस्तबद्ध माऱ्यापुढे संपूर्ण श्रीलंकन संघ २० षटकांत १११ धावांत संपुष्टात आला आणि भारताने दिमाखात आशियाई चषकावर आपले नाव कोरले.





