#Shravani Somvar : आवडे हे रूप गोजिरे सगुण… तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त विठ्ठल मंदिराला फुलांची आरास

पुणे – सध्या पवित्र असा श्रावण महिना सुरु झाला आहे. हा महिना भगवान शंकराच्या उपासनेसाठी अतिशय महत्व पूर्ण आहे.
हिंदू श्रद्धेनुसार या दिवशी भगवान शिवशंकर आणि पार्वतीची पूजा करणाऱ्या भक्तांना आनंदी, शांती आणि समृद्ध जीवनाचा आशीर्वाद मिळतो.
आज तिसरा श्रावणी सोमवार असल्याने राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी असणाऱ्या पंढरपूर येथील सावळया विठुरायाच्या आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराला आकर्षक रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले आहे.
यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा गाभारा सोळखांबी, चारखांबी तसेच मंदिराच्या विविध भागांना गुलछडी, गुलाब, शेवंती, ग्लेंडर, निळ्या रंगाचा ब्ल्यू डीजे, पिवळा झेंडु , कामिनी, पांढऱ्या रंगाचा टौटिस, ड्रेसिना, औरकेड अशा विविध आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे.
या सुंदर आणि आकर्षक सजावटीसाठी जवळपास एक टन फुलांचा वापर करण्यात आला आहे.
विविध रंगाच्या फुलांनी देवाचा गाभारा उजळून निघाला आहे.





