Shravan Somwar: पहाटेपासूनच लांबच लांब रांगा! पहिल्या श्रावणी सोमवारी शिवमंदिरांमध्ये भाविकांची तुफान गर्दी
Shravan Somwar: श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी प्राचीन शिवमंदिरांमध्ये पहाटेपासूनच अभिषेक, रुद्रपाठ आणि महापूजा; 'हर हर महादेव'च्या जयघोषाने परिसर भक्तिमय.

Shravan Somwar – श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी विविध प्राचीन आणि ऐतिहासिक महादेव मंदिरांमध्ये शिवभक्तांचा जनसागर लोटला. पहाटेपासूनच मंदिरांमध्ये दर्शन आणि अभिषेकासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. अभिषेक, महापूजा, रुद्रपाठ, आरती आणि भजनाच्या कार्यक्रमांनी दिवसभर धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. तालुक्यातील वारंगवाडी येथील संगमावरील शिवमंदिर, अंदर मावळातील वडेश्वर, तळेगावातील बनेश्वर व हरणेश्वर मंदिर, इंदोरी येथील इंद्रेश्वर मंदिर यासह कामशेत,
पवनानगर आणि आढले परिसरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंदिरांच्या परिसरात बेलाची पाने, फुले, हार, प्रसाद आणि पूजासाहित्याची दुकाने थाटण्यात आली होती. त्यामुळे मंदिर परिसरात सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. दिवसभर भजन आणि शिवभक्तीची गीते ऐकू येत होती. तळेगाव दाभाडे शहरातील ऐतिहासिक श्री बनेश्वर मंदिरात पहाटेपासूनच शिवभक्तांनी दर्शन आणि अभिषेकासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या.
मंदिर संस्थेच्या वतीने भाविकांसाठी दर्शन बारीची व्यवस्था करण्यात आली होती. मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शहरातील कल्याणेश्वर मंदिर, गाव तलाव परिसरातील शंकराचे मंदिर, कलापिनी जवळील स्वयंभू महादेव मंदिर, तळेगाव स्टेशन परिसरातील शंकर मंदिर तसेच हरणेश्वर टेकडीवरील मंदिरातही दिवसभर भाविकांची मोठी वर्दळ होती. यशवंतनगर परिसरातील शंकर मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.
घोरवडेश्वर मंदिरातही रेलचेल
शेलारवाडी येथील श्रीक्षेत्र घोरवडेश्वर डोंगरावरील लेणीतील शिवलिंगाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असतानाही शिवभक्तांचा उत्साह कायम होता. पहाटे शिवलिंगाला महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर महापूजा आणि आरती झाली. सकाळी महारुद्राभिषेकही करण्यात आला. हरिमहाराज बोडके यांनी धार्मिक विधी पार पाडले. भाविकांना शिस्तबद्ध पद्धतीने रांगेतून दर्शनासाठी सोडण्यात येत होते.
यावेळी पुजारी गणेश महाराज बोडके, जिल्हा परिषद सदस्या मनीषा मुऱ्हे, पल्लवी दाभाडे, राहुल भेगडे, श्रीधर गोपाळे, हरिमहाराज बोडके, सचिन बोडके, वीरेंद्र राऊत, वैभव राऊत आदी उपस्थित होते. घोरवडेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने डोंगराच्या पायथ्याशी भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष रघुवीर शेलार यांच्यासह विश्वस्त उपस्थित होते. घोरवडेश्वर प्रासादिक दिंडीच्या वतीने संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.






