श्रद्धा वालकर हत्याकांड ! आरोपी आफताबची न्यायालयात कबुली ; म्हणाला,”Yes I am guilty…!

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात आतापर्यंतची सर्वात महत्वाची माहिती समोर येत आहे. हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावाला याने न्यायालयात आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आफताबची आज कोठडी संपत असल्याने दिल्लीमधील साकेत कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी त्याने न्यायाधीशांसमोर आपणच श्रद्धाची हत्या केली असल्याचे मान्य केले आहे. दरम्यान, त्याच्या कबुलीनंतर न्यायालयाने आफताबच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे.
न्यायालयासमोर कबुली जबाब देताना,‘आपण रागाच्या भरात कोणताही विचार न करता हत्या केल्याचा’ दावा आफताबने केला आहे. हत्येला सहा महिने झाले असून, काही गोष्टी आपल्याला आठवत नसल्याने पोलिसांना सांगू शकत नसल्याचेही त्याने म्हटले आहे. तसेच आपण पोलिसांना तपासात सहकार्य करत असून, यापुढेही करत राहू असे आश्वासन त्याने दिले आहे.
आफताबची नार्को चाचणी करण्याआधी पॉलिग्राफ चाचणी करण्याची आवश्यकता आहे. न्यायालयाने परवानगी दिली नसल्याने सोमवारी आफताबची नार्को चाचणी होऊ शकली नाही. दरम्यान न्यायालयाने आता आफताबची पॉलीग्रीफी चाचणी करण्यास परवानगी दिली आहे. आफताबनेही त्यासाठी संमती दर्शवली असल्याची माहिती आहे.
दरम्यान पोलिसांनी सोमवारी महरौलीच्या जंगलात जबडा आणि काही हाडं सापडली आहेत. हा जबडा श्रद्धाचा आहे का याची माहिती घेण्यासाठी दिल्ली पोलीस एका डेंटिस्टकडे पोहोचले होते. डेंडिस्ट सध्या चाचपणी करत आहेत.





