Manoj Jarange: “‘त्यांचा’ जीव गेल्यावर आरक्षण घ्यायचं का?”, त्यांना काही झालं तर मी विष पिऊन मरेन”; आजारी मुलाला घेऊन आलेल्या महिलेने फोडला हंबरडा

Manoj Jarange : राज्यात मराठा समाजाच्या मागणीच्या आंदोलनाने आक्रमक स्वरूप धारण केले आहे. कारण एका महिन्याची मुदत देऊनही सरकारकडून आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणताही तोडगा काढता आला नाही त्यामुळे पुन्हा एकदा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे बेमुदत उपोषणासाठी बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली असून त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर नांदेडमधून एक महिला आंदोलक आपल्या आजारी मुलासह अंतरवाली सराटी याठिकाणी आल्या अन् त्यांनी जरांगेंची प्रकृती पाहून हंबरडा फोडला.
नांदेडच्या महिला आंदोलक यांनी जरांगेच्या उपोषणाला पाठिंबा दिला. तसेच त्यांनी अवस्था पाहून म्हणाल्या, “आरक्षण मिळेल, पण मनोज जरांगेंची एक एक पेशी तुटून ते मरायला लागले आहेत. त्यामुळे आत्ता त्यांना उपचाराची गरज आहे. आपण आज ना उद्या सरकारकडून आरक्षण घेणारच आहोत. परंतु आता आपण बघ्याची भूमिका घेणं म्हणजे आपला अतिशय नालायकपणा आहे, अतिशय मुर्खपणा आहे. आपण मनोज जरांगेंचा जीव गेल्यावर आरक्षण घ्यायचं का?” असा संतप्त सवाल केला.
पुढे त्यांनी “आरक्षण बघण्यासाठी मनोज जरांगे जीवंत पाहिजे. त्यांनी तपासणीसाठी आणि उपचारासाठी नकार दिला आहे. मात्र, ते आपल्यासमोर जीव देत असतील, तडफडून मरत असतील, तर आपण सर्व बांधवांनी आणि शासनाने ते कसे तडफडून मरत आहेत हे बघायचं का? सरकारला तर त्यांचा जीवच घ्यायचा आहे हे स्पष्ट झालं आहे,” असा आरोप या महिला आंदोलकाने केला.
या महिला आंदोलक पुढे म्हणाल्या, “सरकारला वेळ देऊनही त्यांनी काहीच केलं नाही. ४० दिवसात सरकारने काही प्रयत्न केल्याचं ऐकलं आहे का? विधीमंडळात बैठक घेतली नाही, केंद्रात बैठक घेतली नाही. यांना फक्त पुराव्यांच्या आधारे संसदेत आणि विधीमंडळात विधेयक पारित करायचं होतं. त्यांनी ते केलं नाही. म्हणजे त्यांना माझ्या भावाचा जीव धोक्यात टाकायचा होता.”
“मी माझ्या भावाला असं बघू शकत नाही. तुम्ही प्लिज माझ्या भावाचा जीव वाचवा, अन्यथा मी विष पिऊन मरेन. त्यांना दवाखान्यात घेऊन जा. त्यांची तब्येत खूप गंभीर होत आहे. मी खूप रुग्ण हाताळले आहेत. मला माहिती आहे. त्यांच्यात अजिबात त्राण राहिलेले नाही. ते हात हलवत आहेत, पाय हलवत आहेत, बोलत आहेत म्हणजे त्यावरून तुम्ही असं समजू नका की त्यांची तब्येत चांगली आहे,” अशी माहिती या आरोग्यसेविका असलेल्या महिला आंदोलकाने दिल्या.
“त्यांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या झाल्या आहेत. त्या गुठळ्या कधीही त्यांच्या मेंदूत किंवा हृदयात अडकून माझ्या भावाचं काहीही होऊ शकतं. त्यामुळे या स्थितीत मला माझा भाऊ महत्त्वाचा आहे. ते उपचार घेत नाहीत तोपर्यंत मी इथून उठणार नाही. मी जीव देईन. माझ्या भावावर उपचार केल्याशिवाय मी जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. “प्लिज मला भेटू द्या, मी त्यांच्याशी बोलते. मला त्यांच्या पाया पडू द्या. आपण त्यांना उचलून नेऊ, आयसीयूत दाखल करू,” असेही त्यांनी यावेळी म्हटले.





