Nagar : मतदारसंघात युरिया व रासायनिक खतांचा तुटवडा

श्रीरामपूर : श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी युरिया व रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. खरीप हंगामामुळे खतांची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे, परंतु काही ठिकाणी युरिया व रासायनिक खतांचा तुटवडा असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी आमदार हेमंत ओगले यांच्याकडे केल्या होत्या.
त्याअनुषंगाने आमदार ओगले यांनी तातडीने मुंबई येथे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. यावेळी त्यांच्यासमवेत माजी नगराध्यक्ष संजय फंड, बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहानी, आशिष धनवटे, मर्चंटचे संचालक निलेश नागले उपस्थित होते.
सध्या तालुक्यात 32 हजार 890 इतके क्षेत्र लागवडीखाली असून, त्यामध्ये गहू व हरभरा तसेच कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे. त्यासाठी युरिया व इतर रासायनिक खतांची मोठी मागणी होत आहे, परंतु मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतीविषयक औषधे व खते पुरवणाऱ्या कंपन्या या युरिया व रासायनिक खतांबरोबरच त्यांचे इतर उत्पादनांची खरेदी करायला भाग पडत आहे, त्याचा परिणाम खते विक्रेत्यावर होताना दिसून येत आहे.
खतांच्या तुटवड्यामुळे पिकांची वाढ व उत्पादन यामध्ये मोठी घट होण्याची भीती आहे. आपण संबंधित यंत्रणेला सूचना देण्याची विनंती आमदार ओगले यांनी कोकाटे यांच्याकडे केली. यावर कृषिमंत्री कोकाटे यांनी ताबडतोब या विषयाची दखल घेऊन लगेचच भ्रमणध्वरीद्वारे कृषी विभागाचे सहसंचालक काटकर तसेच जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांना श्रीरामपूर मतदारसंघात होणाऱ्या युरिया व रासायनिक खतांचा पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्याची माहिती आमदार ओगले यांनी दिली.





