Hardeep Singh Puri : “देशात कुठलाही इंधन तुटवडा नाही…”; पेट्रोलियम मंत्र्यांची लोकसभेत ग्वाही

Hardeep Singh Puri : देशात इंधनाचा कुठलाही तुटवडा नाही, अशी ग्वाही केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी गुरूवारी लोकसभेत दिली. इंधन टंचाईविषयी कुठल्या अफवा पसरवू नये, असे आवाहनही त्यांनी विरोधकांना उद्देशून केले.
पश्चिम आशियातील युद्धामुळे भारतात इंधन पेच निर्माण होण्याची धास्ती व्यक्त केली जात आहे. त्या मुद्द्यावर लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त केली. त्यावर केंद्र सरकारच्या वतीने पुरी यांनी उत्तर दिले.
देशातील ३३ कोटी कुटूंबांच्या स्वयंपाकघरांना गॅसची कमतरता जाणवणार नाही याबाबीला सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. देशात पुरेशा इंधन पुरवठ्याची पूर्ण निश्चिती केली जात आहे.
त्यामुळे कच्चे तेल, पेट्रोल, डीझेल, केरोसिन, विमान इंधनाचा तुटवडा नाही. देशभरातील रिटेल आऊटलेटस्मध्ये योग्य साठा आहे. पेट्रोलियम उत्पादनांच्या पुरवठा साखळ्यांचे कार्य सुरळितपणे चालू आहे. त्याशिवाय, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील केरोसिनचे अतिरिक्त वाटप सर्व राज्यांना करण्यात आले आहे, असे त्यांनी नमूद केले.
जागतिक ऊर्जा पुरवठ्याच्या इतिहासात सध्याची वेळ कधी आली नाही. मात्र, आपला देश अडथळे पार करून मार्गक्रमण करत आहे. एलपीजी उत्पादन २८ टक्क्यांनी वाढवण्यात आले आहे. गॅस पुरवठ्यासाठी घरांना आणि शेतांना प्राधान्यक्रमावर ठेवण्यात आले आहे.
युद्धाआधी भारताच्या ४५ टक्के कच्च्या तेलाची आयात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होत होती. त्यापेक्षाही अधिक आयात सध्या होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावी राजनैतिक प्रयत्नांमुळे ते शक्य झाले. आपला देश वर्ष २००६ मध्ये २७ देशांमधून कच्चे तेल घ्यायचा. आता त्या देशांची संख्या वाढून ४० इतकी झाली आहे, असे पुरी म्हणाले.






