पुणे मनपाच्या रुग्णालयात औषधांचा तुटवडा; रुग्णांची अवस्था ’ना घर का, ना घाट का’

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या रुग्णालयातच औषधांचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. गेल्या 15 दिवसांपासून महापालिकेच्या रुग्णालयात औषधांचा तुटवडा आहे. आरोग्य विभागाच्या औषध विभागात औषधांचा साठा कमी झाल्याने तुटवडा निर्माण झाल्याची माहिती मिळत आहे. औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना औषधांसाठी सतत बाहेर चकरा माराव्या लागत आहेत. महापालिकेकडून जादा औषध साठा देण्याची राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडे मागणी करण्यात येत आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागात औषधांचा तुटवडा असल्याने गरीब आणि गरजू रुग्णांना सध्या औषधांची प्रतीक्षा करावी लागत आहे. गेल्या १५ दिवसांपासून महापालिका आरोग्य विभागाच्या औषध भांडारात साठा संपत आल्याने गरजू रुग्णांना औषधांशिवाय परत जावे लागत असल्याचे चित्र महापालिकेच्या रुग्नालयत आहे. विनाकारण उन्हात रुग्णांना हेलपाटे मारावे लागत आहेत. आर्थिक क्षमता नसतानाही बाहेरून महागडी औषधे खरेदी करावी लागत असल्याचे रुग्णांकडून सांगण्यात येत आहे.
सहापैकी केवळ दोनच गोळ्या मिळत आहेत
शहरी गरीब योजनेअंतर्गत एक लाखाहून कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना दोन लाख रुपयांपर्यंत किमतीचे उपचार मोफत दिले जातात. महापालिकेच्या रुग्णालयात गोळ्या आणण्यासाठी रुग्ण गेल्यानंतर त्यांना सहा गोळ्यांपैकी फक्त केवळ दोनच गोळ्या मिळत आहेत. यामुळे वाढत्या अधिकच्या गोळ्यांसाठी महागाईत गरीब रुग्णांनी जायचे कोठे?, औषध कोठून घ्यायचे? असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.
शंकराव पोटे दवाखान्यात औषधाचा तुटवडा
सातारा रस्त्यावरील पद्मावती येथील महापिलकेचा मुख्य असणाऱ्या कै. शंकरराव पोटे दवाखान्यात दररोज तीनशे रुग्णांची तपासणी होते. यामध्ये शहरी गरीब सह सीएचएस रुग्णांना औषध पुरवठा केला जातो. यामध्ये शेकडो रुग्णांना रोज कमी गोळ्या घेऊन जे मिळते त्यावर समाधान व्यक्त करावे लागत आहे. यामध्ये मूत्रविकार, मधूमेह, क्षयरोग अशा गंभीर रुग्णांनाही पुरेशा गोळ्या दिल्या जात नाहीत.





