“देशाच्या गद्दारांना गोळ्या घाला ;आम्ही स्वातंत्र्य मिळवून देऊ”

अमित शहांच्या रॅलीतील घोषणाबाजीने नवा वाद
नवी दिल्ली : देशात मागील काही दिवसांपासून सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यात येत आहे. त्यासाठी देशभरात आंदोलने आणि निदर्शने करण्यात आली. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रॅलीत घोषणाबाजी झाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. दिल्लीमध्ये अमित शाह यांच्या रोड शो दरम्यान देशाच्या गद्दारांना गोळ्या घाला तसेच आम्ही स्वातंत्र्य मिळवून देऊ अशा घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, या घोषणाबाजीमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
अमित शहा यांच्या रॅलीतील घोषणाबाजीषियी भाजपाने मात्र या घोषणांचा पक्षाशी काही संबंध नसल्याचे म्हटले आहे. दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी आपण किंवा पक्ष अशा घोषणांचे समर्थन करु शकत नसल्याचे सांगितले आहे. भाजपा आरोग्य, पाणी, स्वच्छता तसेच विकासाच्या मुद्द्यांवर दिल्ली विधानसभा निवडणूक लढवत असल्याचेही ते म्हणाले आहेत. अमित शहा आणि मनोज तिवारी स्थानिक उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी रोड शो करत असताना या घोषणा देण्यात आल्या. सुधारित नागरिकत्व विधेयकावरुन (सीएए) उपस्थित होत असलेल्या प्रश्नांवर बोलताना मनोज तिवारी यांनी सांगितलं की, संपूर्ण देश सीएएला समर्थन देत आहे. मात्र काहीजण मुद्दाम विरोध दर्शवत आहेत.
दरम्यान रविवारी अमित शहा यांच्या रॅलीत एका तरुणाने सीएएविरोधात घोषणाबाजी केली असता उपस्थितांकडून त्याला मारहाण करण्यात आली. अमित शहा यावेळी तिथेच उपस्थित होते. त्यांनी सुरक्षेसाठी तैनात कर्मचाऱ्यांना तरुणाला सुरक्षितपणे तेथून घेऊन जाण्याचा आदेश दिला. बाबरपूर विधानसभा मतदारसंघात अमित शहा यांची रॅली सुरु असताना चार ते पाच तरुणांनी सीएए रद्द करा अशी मागणी करत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी उपस्थितांनी एका तरुणाला घेराव करत मारहाण केली.





