Sholay-style: मामुर्डीत शोले स्टाईल प्रेमनाट्य! प्रेयसीचा होकार मिळताच तरुण टॉवरवरून खाली
Sholay-style : हातात वरमाला घेऊन प्रेयसीने घातली साद

पिंपरी – शोले चित्रपटातील वीरू पाण्याच्या टाकीवर चढल्याचा प्रसंग अनेकांनी पाहिला असेल. असाच काहीसा प्रकार रविवारी मामुर्डीत घडला. प्रेयसीसोबत झालेल्या वादानंतर एका मद्यधुंद तरुणाने थेट १०० फूट उंच मोबाइल टॉवर गाठला. लग्नाला होकार दिल्याशिवाय खाली उतरणार नाही, असा हट्ट त्याने धरला.
पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि नातेवाइकांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अखेर प्रेयसीने हातात वरमाला घेऊन लग्नाला होकार दिल्यानंतरच तो खाली उतरण्यास तयार झाला. तब्बल पावणेचार तास चाललेल्या या नाट्याचा शेवट सुखरूप सुटकेने झाला.
उबेदुल्ला शेख (वय २२, मूळ रा. धुबरी, आसाम) असे या तरुणाचे नाव आहे. मामुर्डी येथील एका मोबाइल टॉवरवर रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला.
शेजारी राहणाऱ्या प्रेयसीसोबत उबेदुल्लाचा काही कारणावरून वाद झाला. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत त्याने जवळच असलेल्या सुमारे १०० फूट उंच टॉवरवर चढण्यास सुरुवात केली. पाहता पाहता तो टॉवरच्या शिखरावर जाऊन बसला. भरवस्तीत तरुण टॉवरवर चढल्याचे दिसताचनागरिकांची गर्दी जमली.
घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिसांचे पथक, अग्निशमन दलाचे जवान आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी मोबाइलवरून त्याच्याशी संपर्क साधला. नातेवाइकांनीही त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. गावाकडील नातेवाइकांशीही त्याचा संपर्क करून देण्यात आला. मात्र, लग्नाला होकार मिळाल्याशिवाय खाली उतरणार नसल्याच्या भूमिकेवर तो ठाम होता.
तब्बल पावणेचार तासांच्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी प्रेयसीला घटनास्थळी बोलावले. तिच्या हातात वरमाला देण्यात आली. तिने टॉवरखाली उभे राहून लग्नाला होकार दिला.
हा होकार ऐकताच उबेदुल्ला खाली उतरण्यास तयार झाला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या क्रेनच्या साहाय्याने सायंकाळी सव्वासातच्या सुमारास त्याला सुखरूप खाली आणण्यात आले. या घटनेमुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती.





