Zubin Garg : झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण; बुडण्यापूर्वीच तोंडातून आला होता फेस, कोणी दिलं विष?

गुवाहाटी : भारतातील प्रसिद्ध गायक झुबीन गर्गच्या मृत्यूभोवतीचे गूढ दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचे होत चालले आहे. सुरुवातीला हा अपघात मानला जात असला तरी, हळूहळू नवीन रहस्ये उघड होत आहेत आणि या प्रकरणाचा तपास खुनाच्या दृष्टिकोनातून केला जात आहे. या संदर्भात, झुबिनच्या बँड सदस्य शेखर ज्योती गोस्वामी यांनी म्हटले आहे की, झुबिनचा मृत्यु बुडण्याने झाला नसून त्याला विषबाधा झाली होती, असा दावा केला आहे.
शेखर ज्योती गोस्वामी म्हणाले की, झुबिन एक उत्कृष्ट जलतरणपटू होता आणि त्याचा बुडून मृत्यू होऊ शकत नव्हता. झुबिनच्या मृत्यूच्या काही तासांपूर्वी त्याच्या व्यवस्थापकाचे वर्तन संशयास्पद होते. बोटीच्या प्रवासादरम्यान, व्यवस्थापकाने जबरदस्तीने बोटीचा ताबा घेतला. त्यामुळे ती समुद्राच्या मध्यभागी गेली आणि सर्वांचे जीव धोक्यात आले.
गोस्वामी यांनी भारतीय नागरी संरक्षण संहितेअंतर्गत तपासकर्त्यांना आपला जबाब देताना हा खुलासा केला आहे. झुबिनचे व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा आणि महोत्सवाचे आयोजक श्यामकानू महंत यांनी त्याच्यावर विषप्रयोग केल्याचा आरोप केला. जेव्हा झुबीन पाण्यात पडला आणि त्याचा श्वास गुदमरायला लागला तेव्हा तो मदतीसाठी ओरडू लागला.
मला झुबीनच्या तोंडातून आणि नाकातून फेस येत असल्याचे दिसले. परंतु मॅनेजर शर्मा यांनी हा प्रकार अॅसिड रिफ्लक्स असल्याचे सांगितले. झुबीन मदतीसाठी हाक मारत असताना, त्यांचा मॅनेजर वारंवार ओरडत होता, जाबो दे, जाबो दे, म्हणजे, त्याला जाऊ द्या, जाऊ द्या.
मॅनेजरचे नाव एफआयआरमध्ये
गोस्वामींचा आरोप आहे की झुबीनच्या मॅनेजर आणि फेस्टिव्हल आयोजकांनी त्याला विष दिले आणि ते लपवण्यासाठी ही घटना अपघात म्हणून रचली. शर्मा आधीच या प्रकरणात आरोपी आहेत आणि एफआयआरमध्ये त्यांचे नाव आहे. त्यांच्यावर अजामीनपात्र आणि गंभीर आरोप आहेत. त्यात गुन्हेगारी कट, खून आणि हत्येचा समावेश आहे.





