धक्कादायक! किरकोळ वादातून मुलाने वडिलांना संपवले ; कारण वाचून धक्का बसेल

प्रभात वृत्तसेवा
पुणे – किरकाेळ वादातून मुलाने वृद्ध वडिलांवर चाकूने वार करून त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना कोथरूडमधील जयभवानीनगर परिसरात घडली. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी मुलाला अटक केली. तानाजी पायगुडे (७२, रा. जयभवानीनगर, पौड रस्ता, कोथरूड) असे खून झालेल्यांचे नाव आहे. या प्रकरणी मुलगा सचिन तानाजी पायगुडे (३३) याला अटक करण्यात आली. याप्रकरणी तानाजी यांची पत्नी सुमन (६८) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पायगुडे कुटुंबीय जयभवानीनगर भागातील चाळीत राहायला आहेत. दसरा असल्याने पायगुडे कुटुंबीय घरातच होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास तानाजी पायगुडे यांच्या डोळ्यात औषध टाकायचे म्हणून मुलगा सचिन याला दूरचित्रवाणी संच बंद करण्यास सांगितले. या कारणावरून सचिन आणि वडील तानाजी यांच्यात वाद झाला. वादातून सचिनने चाकूने वडील तानाजी यांच्या गळा आणि चेहऱ्यावर चाकूने वार करून आरोपी सचिन घरातून पसार झाला होता.
गंभीर जखमी अवस्थेतील तानाजी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.परिमंडळ तीनचे पाेलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त भाऊसाहेब पटारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेला आरोपी सचिन याला वडिलांचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.





