Shocking News – चाकण परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्रपाळी करून घरी परतत असताना निर्जन रस्त्यावर कुत्र्यांच्या टोळक्याने तिच्यावर हल्ला केल्याने काही मिनिटांतच तिचा मृत्यू झाला. शोभा विजय वाघमारे (वय ३३) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोभा या नेहमीप्रमाणे काम आटपून सोमवारी पहाटेच्या सुमारास पायी घरी जात होत्या. त्या चाकण परिसरातील ‘परदेशी कडबा कुटी’ येथे आल्या असता पाच ते सहा भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने अचानक त्यांच्यावर झडप घातली. कुत्र्यांनी त्यांना खाली पाडून कपडे फाडून टाकले. त्यानंतर शरीरावर ठिकठिकाणी चावा घेत लचके तोडण्यास सुरुवात केली. निर्जन रस्ता आणि पहाटेची वेळ असल्याने त्यांचा आक्रोश कुणालाही ऐकू गेला नाही. काही मिनिटांतच हल्ला इतका भीषण झाला की त्यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी परिसरातील नागरिकांना रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसताच खळबळ उडाली. सुरुवातीला हा खुनाचा प्रकार असावा अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर संपूर्ण घटना उघड झाली. फुटेजमध्ये भटक्या कुत्र्यांचा समूह महिलेवर तुटून पडताना स्पष्ट दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. नागरिकांमध्ये तीव्र संताप या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “आणखी किती निष्पाप जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार?” असा सवाल स्थानिक रहिवाशांनी उपस्थित केला आहे. चाकण आणि एमआयडीसी परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून कामगार वर्गाला रात्री-अपरात्री कामावरून ये-जा करावी लागते. त्यामुळे रस्त्यावर दबा धरून बसलेल्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.