नवी दिल्ली : नुकतेच दिल्लीत प्रेयसीची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे केल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला होता. त्यानंतर अशाच प्रकारच्या काही घटना उघडकीस येत आहेत. मात्र आसाममधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या नवरा आणि सासूची हत्या करून त्यांच्या शरीराचे तुकडे केल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. आसाममधील एका जिम ट्रेनर महिलेने दोन मित्रांच्या मदतीने नवरा आणि सासू या दोघांची हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. एवढेच नाही तर या महिलेने दोघांचेही मृतदेह मेघालयच्या जंगलामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेसह तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही हत्या या गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात करण्यात आल्या. तर पती आणि सासू यांची हत्या केल्यानंतर ते दोघे हरवले असल्याची तक्रार या आरोपी महिलेने पोलिसांत दिली होती. महिलेने प्रियकर आणि त्याचा मित्र अशा दोघांच्या मदतीने पती आणि सासूला संपवले. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर मृतदेह मेघालयातील जंगलात फेकून देण्यात आले. गुवाहाटीचे पोलिस कमिश्नर दिगंता बाराह यांनी याविषयी, हत्या झालेल्या दोघांची ओळख अमरज्योति डे (आरोपी महिलेचा पती) आणि शंकरी डे (आरोपी महिलेची सासू)अशी पटली आहे. आरोपी महिला बंदना कलिता सहित तीचे दोन मीत्र धनजीत डेका आणि अरुप दास या दोघंना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, बंदनाने जुलै २०२२ मध्ये हरवल्याची तक्रार नोंदवली होती. यानंतर नोव्हेंबर २०२२ मृतकांच्या एका नातेवाईकाने गुवाहाटीतील एका पोलिस ठाण्यात याबद्दल तक्रार दिली. यावेळी हत्या झाल्याची शक्यता असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी एफआयआरच्या आधारावर तपास सुरू केला. यानंतर पोलिसांनी बंदनावर संशय घेत चौकशी केली. यानंतर बंदनाने दोन्ही हत्यांची कबूली दिली. पोलिसांनी सांगितले की, बंदनाने २६ जुलै रोजी पतीची हत्या केली. तर दुसऱ्या दिवशी २७ जुलै रोजी मृतदेहाचे तुकडे मेघालयात फेकून दिले. यानंतर १७ ऑगस्ट बंदनाने सासूची देखील हत्या केली आणि १८ ऑगस्ट रोजी मृतदेहाचे तुकडे फेकून दिले. हत्या केल्यानंतर तीने पोलिसांत दोघे हरवल्याचे तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांना संशय येऊ नये म्हणून ती पोलिसांकडून केसबद्दल अपडेट देखील घेत राहिली. दरम्यान आता पोलिसांनी बंदानाच्या जबाबनंतर मृतदेहांचे तुकडे ताब्यात घेतले आहेत. तसेच तीन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान हत्येनंतर मृतदेह फ्रीजमध्ये ठेवल्याचा कुठलाही पुरावा मिळाला नसल्याचे असे पोलिसांनी सांगितले.