धक्कादायक! दारात अभ्यास करत असताना बिबट्याचा घात! ७ वर्षीय मुलाचा आईसमोरच दुर्दैवी मृत्यू

प्रभात वृत्तसेवा
जुन्नर – कुमशेत (ता. जुन्नर) येथील ठाकर वस्तीवर दारात अभ्यास करणाऱ्या सात वर्षीय शाळकरी मुलावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. बुधवारी (दि.२४) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. यात त्याची लहान बहिण बचावली आहे. गेल्या महिन्याभरात जुन्नर तालुक्यात तिसऱ्यांदा बिबट्याचा हल्ला झाला आहे. दरम्यान, शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याचे समजताच संतप्त नागरिकांकडून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची जोरदार मागणी केली.
सिद्धार्थ प्रवीण केदार (वय ७), असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ हा सायंकाळी त्याच्या लहान बहिणीसोबत घरासमोरील ओट्यावर अभ्यास करीत होता. त्याची आई स्वयंपाक करीत होती. घराशेजारीच असलेल्या छपरात बांधलेल्या शेळ्यांवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक सिद्धार्थवर हल्ला केला. बिबट्याने त्याला १५० ते २०० फूट फरफटत उसाच्या शेतात नेले. मुलाचे आई-वडील आणि परिसरातील नागरिक ओरडाओरडा करीत त्याच्यामागे धावले.
नागरिकांनी शोध घेतल्यानंतर फरफटत नेलेल्या ठिकाणी सिद्धार्थच्या हातातून पडलेला पेन आणि काही अंतरावर रक्ताचे डाग सापडले. त्यानंतर उसाच्या शेतात त्याचा मृतदेह छिनविछिन्न अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच सरपंच रवींद्र डोके, पोलीस पाटील मंगेश डोके, पोलीस, वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक किरण अवसर यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.
संतप्त ग्रामस्थांची काढली समजूत..
या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सिद्धार्थचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत वनविभागातील दोषी अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आदिवासी समाजाचे नेते डॉ. विनोद केदारी, नागरिकांनी ही मागणी लावून धरली. यावेळी शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेले डॉक्टर नशेत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला. दरम्यान, लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी संतप्त नागरिकांची समजूत काढल्यानंतर मुलाचा मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.





