Manchar : पश्चिम आदिवासी भागात वीज समस्या दूर
Manchar : यामध्ये ३३ व ११ केव्ही वीज वाहिन्या, नदी ओलांडणी, आधुनिक देखरेख यंत्रणा आणि वीज दाब नियंत्रित करणारी उपकरणे बसविण्यात येणार आहेत. पुढील १५ कामकाज दिवसांत निविदा प्रक्रिया सुरू करून दोन महिन्यांत कार्यारंभ आदेश देण्याच्या सूचना आहेत.

मंचर : डिंभे, भीमाशंकर आणि आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील वीजपुरवठ्याची समस्या दूर करण्यासाठी डिंभे येथे नवीन ३३/११ केव्ही वीज उपकेंद्र उभारण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ३ कोटी ४७ लाख ८८ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्या’अंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव यांनी २३ नोव्हेंबर रोजी प्रशासकीय मान्यतेचे आदेश दिले आहेत. महावितरणच्या मंचर विभागामार्फत डिंभे येथे १ बाय ५ एमव्हीए क्षमतेचे अत्याधुनिक उपकेंद्र उभारण्यात येणार आहे.
यामध्ये ३३ व ११ केव्ही वीज वाहिन्या, नदी ओलांडणी, आधुनिक देखरेख यंत्रणा आणि वीज दाब नियंत्रित करणारी उपकरणे बसविण्यात येणार आहेत. पुढील १५ कामकाज दिवसांत निविदा प्रक्रिया सुरू करून दोन महिन्यांत कार्यारंभ आदेश देण्याच्या सूचना आहेत. उपकेंद्रामुळे शेतकरी, लघुउद्योजक, व्यावसायिक आणि नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा मिळणार असून भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांनाही दिलासा मिळणार आहे. कृषी व पर्यटन विकासालाही यामुळे चालना मिळणार आहे.





