नवी दिल्ली : काही दिवसापूर्वीच एअर इंडियाच्या विमानात महिला कर्मचाऱ्यावर एका प्रवाशाने केलेल्या किळसवाण्या कृत्यानंतर आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिल्लीहून पाटण्याला जाणाऱ्या ‘इंडिगो’च्या विमानात एअर होस्टेससोबत विनयभंग झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. बिहारमधील तीन प्रवाशांनी दारूच्या नशेत एअर होस्टेससोबत ही घटना घडवली. यादरम्यान त्यांनी गोंधळ घातला आणि फ्लाइट कॅप्टनलाही मारहाण केल्याचा आरोप आहे. तिघेही स्वत:ला बिहारमधील सत्ताधारी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या जवळचे असल्याचे सांगत होते. ही घटना गेल्या रविवारी रात्री घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दारू पिऊन इंडिगो फ्लाइट 6E-6383 मध्ये चढले. रात्री 10 वाजता दिल्लीहून पाटण्याला पोहोचल्यानंतर दोघांना विमानतळाच्या आत अटक करण्यात आली. सीआयएसएफने नितीन आणि रोहितला पकडून विमानतळ पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले, तर पिंटू नावाचा तरुण फरार आहे. आरोपींची ब्रेथ अॅनालायझर चाचणी करण्यात आली असून, त्यात त्यांनी मद्यपान केल्याची पुष्टी झाली आहे. तिघेही वैशाली येथील रहिवासी असल्याचे म्हटले जात आहे. इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे. विमानतळ पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, विमानानं दिल्लीहून बिहारला उड्डाण केलं, तेव्हा आरोपींनी अचानक गोंधळ सुरू केला. हा गोंधळ पाहून एअर होस्टेस त्यांना समजावायला गेली. मात्र, आरोपींनी तिलाही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी विमानाच्या पायलटलाही मारहाण करण्यात आली. यानंतर विमानाच्या पायलटने फोन करून संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.