धक्कादायक ! पंजाबमध्ये आपच्या नेत्याची भरदिवसा हत्या

नवी दिल्ली – पंजाबच्या तरणतारण येथे आम आदमी पक्षाचे नेते गुरूप्रीत सिंग उर्फ गोपी चोला यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. तरणतारणच्या गोविंदवाल साहिब रस्त्यावर रेल्वे फाटक उघडण्याच्या प्रतिक्षेत त्यांचे वाहन थांबले असताना एका कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
काही दिवसांपूर्वी नफेसिंह राठी यांची ज्याप्रकारे हत्या झाली होती तशाच प्रकारे गोपी चोला यांचीही हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे तरणतारण येथे प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.
एका खटल्याच्या सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी ते गोविंद साहिब येथे जात असताना त्यांच्यावर हल्ला झाल्याचे पाेलिसांनी सांगितले. रेल्वेचे फाटक बंद असल्यामुळे गोपी चोला त्यांच्या कारमध्येच बसून होते.
त्याचवेळी अचानक तेथे दाखल झालेल्या स्विफ्ट कारमधील अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या अंदाधुंद गोळीबार केला. नफेसिंह राठी यांची हत्या झाली त्यावेळी त्यांची कारही रेल्वेच्या बंद फाटकाजवळच थांबली होती. तेंव्हाच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. हल्लेखोर त्यांच्या कारचा पाठलाग करत त्यांच्या मागावरच होते.





