धक्कादायक.! धुळ्यात सरपंच दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

धुळे – धुळे तालुका पोलिस स्टेशनच्या आवारात शुक्रवारी अकलाडचे सरपंच अजय सूर्यवंशी आणि त्यांच्या पत्नी कल्पना सूर्यवंशी यांनी डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना पोलीस जाणीवपूर्वक अटक करत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. या आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
सरपंच अजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी त्यांनी धुळे तालुका पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील आरोपी निलेश माधव सूर्यवंशी हा गावात मोकाट फिरत आहे आणि त्यांना तसेच त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत आहे.
शेती विक्रीच्या व्यवहारातून झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. सरपंच अजय सूर्यवंशी आणि त्यांचा मुलगा हर्षवर्धन सूर्यवंशी हे त्यांच्या चुलत बंधूंच्या घरासमोरून जात असताना आरोपींनी त्यांच्याशी कुरापत काढली. या आरोपींनी अजय सूर्यवंशी आणि त्यांच्या मुलाला बेदम मारहाण केली.
मारहाणीत मिरची पावडरचा वापर करण्यात आला, तसेच लाकडी कुऱ्हाडीच्या साहाय्याने अजय सूर्यवंशी यांच्या डोक्यात मारहाण करण्यात आली, असा आरोप आहे. या प्रकरणी अजय सूर्यवंशी यांनी तालुका पोलिस स्टेशनमध्ये सुरेश भदाणे, कुणाल भदाणे, निलेश सूर्यवंशी आणि माधव सूर्यवंशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.





