धक्कादायक! किरकोळ वादातून तरुणीने उचलले टोकाचे पाऊल ; तलावात आढळला मृतदेह

प्रभात वृत्तसेवा
खालापूर – वरची खोपोली येथील तरुणीने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून आईसोबत झालेल्या वादानंतर ही घटना घडली. मृत तरुणीचे नाव स्नेहा कट्टिमली (वय १९, रा. क्रांतीनगर, खोपोली) असे आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. १७) सकाळच्या सुमारास आईसोबत झालेल्या किरकोळ वादानंतर स्नेहा घरातून निघून गेली होती. ती परत न आल्याने नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र ती सापडली नाही.
अखेर खोपोली पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार नोंदविण्यात आली.पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्नेहा वरची खोपोली परिसरात गेल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी तलाव परिसरात शोधकार्य सुरू केले असता शनिवारी (दि. १८) साडेअकराच्या सुमारास तिचा मृतदेह शिवकालीन मंदिराजवळील तलावात आढळून आला. या घटनेने क्रांतीनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





