पुणे जिल्हा | अजित पवारांना इंदापुरात धक्का

इंदापूर, (प्रतिनिधी) – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती तालुक्यात जेवढा होल्ड आहे. त्याच बरोबरीचा राजकीय होल्ड इंदापूर तालुक्याच्या राजकारणावर आहे. मात्र लोकसभा निवडुकीतील अपयशानंतर अजितदादांना तालुक्यातून मोठा धक्का बसताना दिसतोय.
शरद पवार Praveen Mane यांच्या अत्यंत जवळचे म्हणून ओळखले जाणारे सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने यांचे चिरंजीव व जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने हे शनिवारी (3 ऑगस्ट) पुणे येथे शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत. त्यामुळे विधानसभेला व आगामी काळात राजकारणात इंदापूरचे अजित पवारांचे गणित बिघडणार हे मात्र निश्चित.
राजकारणात कोणाचाही नाद करा; मात्र शरद पवारांचा नाद कोणी करू नये. असे राज्यभर, देशभर बोलले जाते. याचा प्रत्यय इंदापूर तालुक्यात आजपर्यंत सातत्याने आहे. पुणे जिल्हा बँकेचे संचालक व इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे,
तसेच कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन भरत शहा, नीरा भीमा साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन कांतीलाल झगडे व बाजार समितीचे सभापती विलास माने अशा असंख्य कार्यकर्त्यांचा, बलदंड नेत्यांचा आपल्या पक्षात लोकसभा निवडणुकी आधीच शरद पवारांनी प्रवेश करून घेतला. हा पहिला धक्का थेट अजित पवार व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना होता.
राज्यात विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत. इंदापूर तालुक्यातील आमदार हा आपल्या विचारांचा करायचा, याचा चंग खासदार सुप्रिया सुळे व खुद्द शरद पवार यांनी बांधलेला दिसतो.
लोकसभा निवडणुकीत सोनाई परिवाराची व जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आरोग्य सभापती प्रवीण माने यांची इच्छा नसताना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळी शक्कल लढवून आपल्या राजकीय स्टेजवर लोकसभा निवडणुकीत ठेवले.
मात्र सुप्रिया सुळे यांचा विजय व्हावा यासाठी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर माजी सभापती प्रवीण माने यांनी 60 ते 70 गावात खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार देखील केला होता.
प्रवीण माने समर्थकांना ही राजकीय रणनीती अजिबात आवडलेली नव्हती. मागील पंचवार्षिक पासून प्रवीण माने स्वतः विधानसभेची मनोमन तयारी करीत आहे. खुद्द शरद पवार यांनी, सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने यांच्या प्रेमाखातर देशाचा कायदा बदलला होता. हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे माने समर्थकांची असणारी इच्छा शरद पवारच पूर्ण करू शकतात. असे बोलले जात आहे.
विधानसभेसाठी माने की जगदाळे
इंदापूर विधानसभा कार्यक्षेत्रात पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी विधानसभेची मोठी तयारी केली आहे. जगदाळे यांच्या पक्ष प्रवेशावेळी त्यांना विधानसभेचा शब्द दिला.
अशा चर्चा आहेत. तर आज माजी सभापती प्रवीण माने प्रवेश करत असल्याने, शरद पवारांकडून माने की जगदाळे इंदापूर विधानसभेसाठी याची मात्र चर्चा रंगली आहे. शरद पवार इंदापूर तालुक्यात नव्या समीकरणाची नांदी आणण्याची किमया, कशा पद्धतीने हातळतात. याकडे मात्र तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.





