प्रभात वृत्तसेवा जवळार्जुन – एसटी महामंडळाच्या शिवशाही बसचा ब्रेक फेल झाला. मात्र, तरही प्रसंगावधान राखून बसचालकाने सतर्कता बाळगल्याने मोठा अपघात टळला. ब्रेक फेल ‘शिवशाही’ बस डिव्हायडरवरून थेट समोर असलेल्या घरात घुसली. जेजुरी शहरातून जाणाऱ्या पुणे पंढरपूर महामार्गावर जेजुरी बस स्थानकासमोरील तीव्र उतारावर ही घटना घडली. घराच्या भिंतीला मोठे भगदाड पडले. मात्र, घरात कोणी उपस्थित नसल्याने दुर्घटना टळली. महाराष्ट्राचा लोकदेव खंडोबाची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेजुरीत मंगळवारी सकाळी सात साडेसात वाजता अपघाताचा अनर्थ थोडक्यात टळला. जेजुरी बस स्थानकातून बस बाहेर पडत असताना शिवशाही बसचे ब्रेक निकामी झाले. नियंत्रण सुटलेली बस सर्तक चालकाने मुख्य रस्त्यावरून डिव्हायडर नेली. बस डिव्हायडर ओलांडून थेट रस्त्यापलीकडील समोरच्या घराच्या भिंतीवर आदळली. धडक इतकी जोरदार होती की, घराच्या भिंतीला मोठे भगदाड पडले आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळी जेजुरीतील मुख्य चौकात मोठ्या प्रमाणावर लोकांची वर्दळ असते परंतु सुदैवाने स्वारगेट ते पंढरपूर या मार्गावर धावणारी शिवशाही बसक्रमांक MH 06 BW 4347 सुदैवाने, ज्या घरात बस घुसली, तिथे त्यावेळी कोणीही रहिवासी उपस्थित नव्हते. तसेच, सकाळची वेळ असल्याने महामार्गावर वाहनांची आणि नागरिकांची वर्दळ कमी होती. त्यामुळे या भयानक अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. उड्डाणपुलाची मागणी तीव्र उतारामुळे महामार्ग रस्ता ठरतोय जीवघेणा यापूर्वीही याच महामार्गावर आणि याच ठिकाणी भरधाव वेगात असलेली एक खासगी ट्रॅव्हल्स थेट हॉटेलमध्ये घुसल्याची गंभीर घटना घडली होती. बस स्थानकाबाहेर असलेला तीव्र उत्तार आणि शनिवार-रविवार होणारी वाहतूक कोंडी यामुळे हा परिसर धोकादायक बनला आहे. वारंवार अपघात होऊनही प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सध्याची परिस्थिती पाहता भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच जागे होऊन या मार्गावर उड्डाणपूल उभारावा, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.