Shivrajyabhishek Sohala : किल्ले रायगड सज्ज! ५ आणि ६ जूनला रंगणार ‘शिवराज्याभिषेक सोहळा’; पाहा काय आहे यंदाचे मुख्य आकर्षण?
Shivrajyabhishek Sohala : ६ जूनला मुख्य राज्याभिषेक विधी आणि शिवछत्रपतींच्या मूर्तीवर सुवर्ण मुद्रांचा अभिषेक; राज्यभरातून लाखो शिवप्रेमी रायगडाकडे रवाना.

Shivrajyabhishek Sohala – छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा यंदा ५ व ६ जून ला किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित या लोकोत्सवाला समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे व जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
यंदाच्या सोहळ्यात ‘धार तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची’ ‘जागर शिवशाहीरांचा.. स्वराज्याच्या इतिहासाचा’ आणि ‘सोहळा पालखीचा स्वराज्याच्या एक्याचा’ हे विशेष कार्यक्रम आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत. ५ जून ला दुपारी राजमाता जिजाऊच्या समाधीस अभिवादन करून सोहळ्याची सुरुवात करण्यात येणार असून त्यानंतर युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत शिवप्रेमींसह नाणे दरवाजामार्गे गड चढाई केली जाणार आहे.
नगारखाण्यात गडपूजन झाल्यानंतर होळीच्या माळावर पारंपारिक युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर केली जातील. सायंकाळी ढोल- लेझीम वारकरी संप्रदायाचा टाळ-मृदंग गजर, राजसद्रेवरील शिवशाहीरांचा जागर, शिरकाई देवीचा गोंधळ तसेच जगदीश्वर मंदिरात किर्तन भजनाचे कार्यक्रम होणार आहेत, ६ जून ला सकाळी ध्वजारोहणाने मुख्य सोहळ्याला प्रारंभ होईल. त्यानंतर शाहिरी कार्यक्रम, शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचे राजसदरेवर आगमन आणि राज्याभिषेकाचा मुख्य विधी पार पडणार आहे.
युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या उत्सवमूर्तीला अभिषेक तसेच सिंहासनारूढ मूर्तीवर सुवर्ण मुद्रांचा अभिषेक करण्यात येणार आहे. या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी राज्यभरातील शिवप्रेमी, इतिहासप्रेमी आणि पर्यटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी केले आहे.





