Plastic Ban PCMC : कागदावरच प्लास्टिक बंदी! नालेसफाईत निघाला प्लास्टिकचा डोंगर; पावसाळ्यात पुराचा धोका?
Plastic Ban PCMC : पिंपरी-चिंचवडमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर बिनधास्त; नाले तुंबल्याने पावसाळ्यात शहरात पाणी साचण्याची भीती वाढली.

Plastic Ban PCMC – एकीकडे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचे संदेश दिले जात आहेत. वृक्षारोपण, स्वच्छता आणि जनजागृतीचे कार्यक्रम होत आहेत. मात्र दुसरीकडे पिंपरी-चिंचवड शहरात प्रतिबंधित प्लॅस्टिकचा वापर बिनधास्तपणे सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. रस्ते, नाले, कचराकुंड्या आणि मोकळ्या जागांमध्ये प्लास्टिकचा वाढता कचरा पर्यावरणासमोर मोठे आव्हान निर्माण करत आहे.
महापालिकेकडून प्लॅस्टिक बंदीबाबत वारंवार सूचना आणि कारवाईचे दावे केले जातात. मात्र प्रत्यक्षात शहरातील अनेक बाजारपेठा, फेरीवाले, भाजी विक्रेते आणि किरकोळ व्यावसायिकांकडे आजही सर्रास प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होताना दिसत आहे. त्यामुळे प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी केवळ कागदावरच असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. सध्या शहरात पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे सुरू आहेत.
या सफाई मोहिमेदरम्यान नाल्यांमधून मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कचरा बाहेर येत आहे. अनेक ठिकाणी प्लॅस्टिकमुळे नाले तुंबल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याचा आणि पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, सिंगल युज प्लॅस्टिक हे शहरातील प्रदूषणाचे प्रमुख कारण बनले आहे. प्लॅस्टिक सहज नष्ट होत नाही. त्यामुळे ते वर्षानुवर्षे पर्यावरणात कायम राहते. जमिनीची सुपीकता कमी होते.
नाले आणि जलवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. तसेच पाणी आणि मातीचे प्रदूषण वाढते. शहरातील रस्त्यांवर टाकण्यात येणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्यांमुळे मुक्या जनावरांनाही मोठा फटका बसत आहे. अन्नाच्या शोधात भटकणारी जनावरे प्लॅस्टिकसह कचरा खातात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. अनेकदा अशा घटनांमुळे जनावरांचा मृत्यूही होत असल्याचे पशुप्रेमी सांगतात. महापालिकेच्या कारवाईत सातत्य नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.
एखाद्या दिवशी छापेमारी होते. दंड आकारला जातो. काही दिवस प्लॅस्टिकचा वापर कमी होतो. मात्र त्यानंतर पुन्हा परिस्थिती पूर्ववत होते. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांऐवजी प्लॅस्टिक उत्पादक आणि घाऊक पुरवठादारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणप्रेमींनी प्रशासन आणि नागरिक दोघांनाही आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले आहे. प्लॅस्टिकमुक्त शहराचा संकल्प केवळ भाषणांपुरता न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याची गरज व्यक्त होत आहे.
पर्यावरण दिनाचा खरा संदेश
जागतिक पर्यावरण दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा विषय नाही. तो जीवनशैली बदलण्याचा संकल्प आहे. पिंपरी-चिंचवडला खऱ्या अर्थाने स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक शहर बनवायचे असेल तर प्लॅस्टिकमुक्तीची लढाई प्रत्येक नागरिकाने आपल्या घरापासून सुरू करणे गरजेचे आहे.






