Shivraj Singh Chouhan : खर्गे यांची टीका म्हणजे जनादेशाचा अवमान; शिवराज यांचा पलटवार
केंद्र सरकारचे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी अवैध पंतप्रधान असल्याचे कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले. ती टीका जनादेशाचा अवमान करणारी आहे, असा पलटवार केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी केला.

Shivraj Singh Chouhan : केंद्र सरकारचे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी अवैध पंतप्रधान असल्याचे कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले. ती टीका जनादेशाचा अवमान करणारी आहे, असा पलटवार केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी केला.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सूचनेवरून खर्गे यांनी तशा प्रकारची टीका केली असावी. त्यातून कॉंग्रेस नेत्यांच्या नैराश्याचे आणखी एक उदाहरण समोर येते.
घटनात्मक संस्थांना लक्ष्य करण्याची कॉंग्रेसची सवयही त्यामुळे अधोरेखित झाली. मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अवैधपणे पदांवर असल्याचे म्हणणे घटनात्मक संस्थांचाही अपमान आहे.
निवडणुकांमध्ये जनतेने नाकारल्यावर कॉंग्रेस पक्ष लोकशाही, निवडणूक आयोग, इव्हीएम, जनादेशाला दोष देतो, असे शिवराज (Shivraj Singh Chouhan) यांनी म्हटले. त्यांनी खर्गे यांच्या टीकेचा समाचार घेण्यासाठी निवेदन जारी केले. कर्नाटकमध्ये शनिवारी पत्रकारांशी बोलताना खर्गे यांनी देशातील सर्व निवडणुका अवैध असल्याचा आरोप केला.
लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा बरखास्त केल्या जाव्यात. मतपत्रिकांच्या आधारे नव्याने निवडणुका घेतल्या जाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, मतदारयाद्या पडताळणीत (एसआयआर) अनियमितता असल्याचे आरोप आदींवरून देशातील वातावरण तापले आहे. तो धागा पकडून खर्गे यांनी भूमिका मांडली.






