Satara News – प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र शासनाने महाराष्ट्रासाठी 30 लाख घरांचे उद्दिष्ट दिले होते. त्यातील पाच लाख घरकुले पूर्ण झाली असून, या घरकुलांचा लोकार्पण आणि या योजनेसाठी दहा हजार कोटी रुपये निधी वितरणाचा कार्यक्रम सातारा येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर उद्या, दि. 15 रोजी सकाळी 11.30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थित होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. सातार्यात होणार्या राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी ना. जयकुमार गोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सौ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, धैर्यशील कदम, सुनील काटकर, कार्यकारी अभियंता मोहसीन मोदी यांनी गुरुवारी सकाळी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री गोरे म्हणाले, बेघरांना घरे देण्याचा केंद्र सरकारचा संकल्प असून, महाराष्ट्राला 30 लाख घरकुलांचे उद्दिष्ट होते. त्यातील पाच लाख घरकुले पूर्ण झाली असून, पुढील वर्षात दहा लाख घरकुलांची कामे करण्यात येणार आहेत. महाराष्ट्राला देशातील उच्चांकी घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत आणि काटकसरीने हा कार्यक्रम करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून प्रातिनिधीक स्वरुलात लाभार्थी येणार आहेत. या लाभार्थ्यांसाठी एसटी बसेसची आणि उपस्थितांसाठी फुड पॅकेटची व्यवस्था करण्यात येणार आहे. उन्हाची तीव्रता जास्त असल्याने, कार्यक्रमाच्या ठिकाणी जागोजागी पंखे व कूलरची व्यवस्था करण्यात येणार आहे.