Revenue Department : नोंदणी शुल्कवाढीचा नागरिकांना फटका; फेरविचाराची महसूलमंत्र्यांकडे मागणी
Revenue Department : नोंदणी व मुद्रांक विभागाच्या शुल्कवाढीचा फेरविचार करण्याची मागणी अॅड. विशाल डोंगरे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.

Revenue Department : नोंदणी व मुद्रांक विभागाने विविध सेवांच्या शुल्कात केलेली मोठी वाढ नागरिकांवर आर्थिक बोजा टाकणारी असून, त्या तुलनेत नागरिकांना पुरेशा सुविधा मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. वाढीव शुल्काचा फेरविचार करून नागरिकांना पारदर्शक, जलद आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी अॅड. विशाल डोंगरे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नोंदणी व मुद्रांक विभागाच्या विविध सेवांसाठी करण्यात आलेल्या शुल्कवाढीकडे अॅड. डोंगरे यांनी महसूलमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. दस्ताच्या पानांशी संबंधित शुल्क पूर्वी प्रतिपान २० रुपये होते. त्यात वाढ करून आता ४० रुपये करण्यात आले आहे. तसेच अभिनिर्णयासाठी पूर्वी १०० रुपये शुल्क आकारले जात होते; आता त्यासाठी एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शुल्कात मोठी वाढ करण्यात आली असली तरी त्या तुलनेत नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांचा दर्जा सुधारलेला नाही, असा आरोप अॅड. डोंगरे यांनी केला आहे. ऑनलाइन दस्तांच्या अस्पष्ट प्रती, डेटा एन्ट्री प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, ओटीपीमुळे होणारा अनावश्यक विलंब तसेच नोंदणी कार्यालयांमधील अपुऱ्या सुविधा याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.





