Shivaji Maharaj statue collapsed: राजकोट किल्यावर राणे-ठाकरे समर्थकांचा राडा; तब्बल ‘इतक्या’ जणांवर गुन्हे दाखल

Chhatrapati Shivaji Maharaj statue collapsed । सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. त्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.
विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पहिली कारवाई करत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. जयदीप आपटे आणि डॉ. चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल महाविकास आघाडीकडून मालवणमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होत. मात्र हा मोर्चा होण्यापूर्वीच राजकोटवर कट्टर विरोधक खासदार नारायण राणे विरुद्ध ठाकरेंची शिवसेना आमने-सामने येऊन आले. एवढेच नाही तर नेत्यांच्या समोरच एकमेकांवर धावून जाण्याचा प्रकार सुद्धा याठिकाणी घडला.
हा सगळा गोंधळ सुरु असताना ठाकरे गटाकडून सुद्धा पोलिसांना इशारा देण्यात आला. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी जर आम्हाला पंधरा मिनिटांमध्ये रस्ता करून दिला नाही, तर शिवसेना रस्त्यावरची संघटना आहे आम्ही सुद्धा दाखवून देऊ असा इशारा दिला.
दरम्यान, काल घातलेल्या राड्याप्रकरणी मालवण पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत. राडा करणाऱ्या ठाकरे आणि राणे या दोन्ही गटातल्या कार्यकर्त्यांपैंकी एकूण 42 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. विशेष म्हणजे 42 जणांसह शेकडो अज्ञातांवरही गुन्हे दाखल झालेत.
एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार
महाविकास आघाडीचे कार्यकर्ते राजकोटवर पोहोचले असतानाच खासदार नारायण राणे माजी खासदार निलेश राणे यांच्यासह पुतळ्याची ठिकाणी पाहणी करण्यासाठी आले.
दरम्यान हा सर्व प्रकार सुरू असतानाच ठाकरे गटाचे आणि भाजप समर्थक एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार सुद्धा घडला. एकमेकांच्या कार्यकर्त्यांना ओढून मारण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे पुतळा पाहणीचा जो कार्यक्रम होता तो बाजूला पडून एकमेकांच्या कार्यकर्त्यांवर धावून जाण्याचा प्रकार घडल्याने या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.





