नारायणगाव : जुन्नर तालुक्यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) आणि शिवसेना (उबाठा) हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे ‘घड्याळ’ या चिन्हावर लढवणार आहेत. नारायणगाव येथे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही महत्त्वाची घोषणा करण्यात आली. यावेळी माजी आमदार अतुल बेनके, सभापती संजय काळे आणि महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. खासदार कोल्हे यांनी सांगितले की, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्याचा फायदा पक्षाला झाला आहे. याच धर्तीवर राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये मतांची विभागणी टाळण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांनी बारामती येथील बैठकीत एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. समविचारी मतांचे ध्रुवीकरण रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, जुन्नरमध्ये महाविकास आघाडीचे पूर्ण ताकदीने काम करण्याचे नियोजन आहे. खेडमध्ये शिवसेना उबाठासोबत चर्चा सुरू असून शिरूर आणि हवेलीबाबत दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी आमदार अतुल बेनके यांनी इशारा दिला की, अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काम करणाऱ्या किंवा पक्षविरोधी कृती करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कडक कारवाई केली जाईल. तालुक्यातील जागावाटपाचे सविस्तर सूत्र येत्या दोन दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. आंबेगाव तालुक्यात मात्र काही कारणास्तव एकमत होत नसल्याने तिथे वेगळा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला पांडुरंग पवार, तुषार थोरात, शरद चौधरी, अनंतराव चौगुले, गुलाब पारखे आणि पूजा बुट्टे पाटील यांसह मान्यवर उपस्थित होते.