शिवसेना खासदार संजय राऊत यांची झालेली झंझावाती सभा हडपसर शिवसेनेला नवसंजीवनी मिळवून देईल ?

हडपसर, (विवेकानंद काटमोरे) –हडपसरमध्ये नुकतीच झालेली खासदार संजय राऊत यांची झंझावाती सभा हडपसर शिवसेनेला नवसंजीवनी मिळवून देईल. अशी आशा शिवसैनिकांना आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर वरिष्ठ नेत्यांची सभा शिवसेनेमध्ये उत्साह आणेल असे वातावरण करणे गरजेचे होते. नेमकी तीच गरज ओळखून हडपसर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांची सभा हडपसर येथे घेतली. त्यानंतर वातावरण ढवळून निघाले व शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला. हा उत्साह कायम टिकवण्याची आता शिवसेनेला गरज आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघ हा पूर्वाश्रमीचा समाजवाद्यांचा नंतर कॉंग्रेस विचारसरणीचा राहिलेला आहे. १९९५ या निवडणुकीत विधानसभा सदस्य म्हणून पहिल्यांदा शिवसेनेचा भगवा या विधानसभा मतदारसंघात फडकला ,पुढे सन २००९ मध्येही याची पुनरावृत्ती झाली. त्यानंतर कोंढवा, महंमदवाडी, हडपसर परिसरात शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले. शिवसेनेने आपली पकड हळूहळू या मतदार संघात मजबूत केली. शिवसेनेच्या राज्यस्तरीय पदाधिकार्यांनीही या मतदारसंघात आपले लक्ष घातले. शिवसेना नेते रवींद्र मिर्लेकर,डॉ. नीलम गोऱ्हे, उदय सामंत व सध्याचे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहिर यांनी पुणे शहरातील पूर्व भाग असलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघाची संघटनात्मक बांधणीसाठी चांगले प्रयत्न केले. त्याचाच परिणाम म्हणून पुणे महानगरपालिकेत शिवसेना नगरसेवकांची संख्या वाढलेली होती.
मागील पुणे महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचं झंझावातामध्ये शिवसेना नगरसेवकांची संख्या कमी झालेली असली तरी या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येण्यासाठी संघटनात्मक बांधणीवर जोर देणे गरजेचे आहे. महंमदवाडी व कोंढवा येथील शिवसेनेच्या नगरसेवकांनी आपला गड भाजपच्या झंझावातात ही कायम राखला होता. महंमदवाडी येथील शिवसेनेचे नगरसेवक नाना भानगिरे यांनी एका आमदारांच्या तोडीस तोड किंबहूना त्याहूनही अधिक अशी विकासकामे आपल्या मतदारसंघात केलेली आहेत. अशी स्तुती स्वतः संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी केली आहे.
शिवसेना या पक्षात शाखाप्रमुखाला महत्त्वाचे स्थान आहे. या संघटनेत शाखा प्रमुखापासून ते शहर प्रमुखांपर्यंत सर्व पदाधिकार्यांना आपले काम नेमून दिलेले आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकार्यांच्या नियुक्त्या पूर्ण झालेल्या दिसतात. युवा सेना व महिला आघाडी यांचीही भरीव कामगिरी आहेच. याबरोबर नव्या युगाच्या प्रचार यंत्रणेसाठी सोशल मीडिया प्रमुख म्हणून पक्षाने अनेक युवक व युवतींची नियुक्ती केलेली आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने सोशल मिडीयाचा वापरही वाढविण्यात आला आहे.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत अनेक प्रभागामध्ये शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. या मतदारसंघात विशेष लक्ष घालून पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी नियुक्त पदाधिकार्यांनी काम सुरू केलेले आहे. आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत याचे फलित काय असेल ते समजेलच.
तूर्तास इतकेच की संजय राऊत यांच्या सभेमध्ये झालेली गर्दी शिवसैनिकांमधील उत्साह शिट्ट्या, टाळ्या व घोषणा यामुळे महापालिका निवडणूक पुढे ढकलल्याने काहीशा मरगळलेल्या शिवसैनिकांमध्ये या सभेने जान आणली असेच म्हणावे लागेल. शिवसैनिकांमधील हा उत्साह कायम राहिल्यास हडपसरमध्ये शिवसेनेला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल ,अशी आशा आहे.
…..अन शिवसेना आपल्या स्टाईल मध्ये
राज्याप्रमाणे हडपसर मध्येही संयम व सहनशीलता अंगीकारताना आंदाेलन व घोषणाबाजी यासाठी प्रसिध्द असलेली शिवसेना काहीशी थंडावली होती. मात्र शिवसेनेच्या नगरसेवकांनी केलेल्या कामाचे श्रेय घेणाऱ्या भाजपला महंमदवाडी येथील शिवसैनिकांनी व माजी नगरसेवक नाना भानगिरे समर्थक नागरिकांनी जशास तसे उत्तर दिल्याने. शिवसैनिक व शिवसेना पुन्हा आपल्या जुन्या स्टाईल यामध्ये आली. जणू काही विरोधकांनीच ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसैनिकांना आपल्या शिवसेना स्टाईलची आठवण करून दिली.





