संसदेतील शिवसेनेचे गटनेते राहुल शेवाळेच; लोकसभा सचिवालयाकडून शिक्कामोर्तब

नवी दिल्ली (प्रतिनिधी) – लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 12 खासदारांच्या गटाला मान्यता दिल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना आणखी एक झटका बसल्याचे मानले जात आहे.
लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, राहुल शेवाळे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे परिपत्रक सचिवालयाचे अतिरिक्त संचालक अजयकुमार सूद यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहे.
शिवसेनेच्या 12 खासदारांनी मंगळवारी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेवून राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी केलेली निवड कायम ठेवण्यात यावी, अशी विनंती केली होती. लोकसभेचे अध्यक्ष बिर्ला यांनी बुधवारी राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली असल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले आहे.
राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल गुरुवारी होणार जाहीर
महत्वाचे म्हणजे, शिवसेनेने अलिकडेच राहुल शेवाळे यांच्याजागी विनायक राउत यांची गटनेतेपदी निवड करण्याची मागणी करणारे पत्र लोकसभेला लिहिले होते. परंतु, खासदारांचे बहुमत लक्षात घेता ओम बिर्ला यांनी सेनेची मागणी धुडकावून लावली. यामुळे, संसदेत स्वत:चे अस्तित्व टिकविण्याचे उध्दव ठाकरे गटाचे प्रयत्न सपशेल अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. राहुल शेवाळे यांना गटनेतेपदी कायम ठेवल्यानंतर संसदेतील शिवसेनेचे कार्यालय शेवाळे यांच्या गटाला दिले जाणार की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.




