मुंबई – शिंदे गटाच्या बंडामुळे आधीच हैराण झालेल्या शिवसेनेमागे आता ईडीने फास आवळला आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते व उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे संजय राऊत यांच्या निवासस्थानी आज ईडीच्या अधिकाऱयांनी धाड मारली. कथित पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई सुरु आहे. राऊत यांच्या निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकल्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक त्यांच्या मैत्री निवासस्थानाबाहेर जमा झाले आहेत.
ईडी करत असलेली करवावी ही राजकीय हेतून प्रेरित असल्याच्या भावना यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केल्या. शिंदे यांच्यासोबत बंड केलेल्या आमदारांच्या गटातील काही जणांवर देखील ईडीच्या कारवाईची टांगती तलवार होती, मात्र आता ते भाजपसोबत गेल्याने त्यांच्यावर ईडी कारवाई करत नाही असा गंभीर आरोप शिवसैनिकांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना केला.
दरम्यान, ईडीने निवासस्थानी धाड मारल्यानंतर संजय राऊत यांनी ट्विट करत भूमिका मांडली आहे. ते लिहतात, “कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय.. मी शिवसेनेसाठी लढत राहीन.”
“खोटी कारवाई.. खोटे पुरावे मी शिवसेना सोडणार नाही.. मरेन पण शरण जाणार नाही जय महाराष्ट्र” ईडीने केलेली कारवाई खोटी असल्याचे संगत संजय राऊत यांनी आपण सेनेतच राहणार असल्याचं म्हंटलं. यापूर्वी राऊत यांनी, शिवसेना सोडण्यासाठी आपल्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप केला होता.