पिंपरी | प्राईम रोझ स्कूलमध्ये शिवजयंती साजरी

वळगाव मावळ, (प्रतिनिधी) – शिव मल्हार एज्युकेशन ट्रस्ट संचलित प्राईम रोझ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
शिवजयंतीच्या सोहळ्याची सुरुवात मुख्याध्यापिका निकिता वधवा यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले. शिवजन्मोत्सवानिमित्त पाळणा या पारंपरिक गीताचे सादरीकरण करण्यात आले.
तसेच अफजलखानवध यावर नाटिका सादर करण्यात आली. त्याचबरोबर शिवाजी महाराजांवरील पोवाडाही सादर करण्यात आला. तसेच शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या कार्याचा आढावा शाळेच्या शिक्षिका व विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून घेतला. शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव या गर्जनांमध्ये आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या.





