Shirur Water Supply: शिरूरकरांसाठी सर्वात मोठी गूड न्यूज! ऐन उन्हाळ्यात ‘या’ निर्णयामुळे मिटली पाण्याची चिंता
Shirur Water Supply: आमदार माऊली कटके यांच्या पाठपुराव्याला यश; नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे आणि डॉ. सुनिता पोटे यांच्या समन्वयामुळे शिरूरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास मार्गी.

Shirur Water Supply – मान्सूनच्या आगमनास विलंब होण्याची शक्यता, वाढते तापमान आणि पिण्याच्या पाण्याबाबत निर्माण झालेली संभाव्य चिंता लक्षात घेता शिरूरकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. घोडनदीवरील हत्तीडोह येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्याने शहराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता तूर्तास दूर झाली आहे. उपलब्ध जलसाठा पुढील ४० ते ४५ दिवस पुरेल, अशी माहिती शिरूर नगरपरिषद प्रशासनाने दिली आहे.
५० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शिरूर शहराचा पाणीपुरवठा घोडनदीवरील हत्तीडोह बंधाऱ्यावर अवलंबून आहे. ५५ दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमता असलेला हा बंधारा सध्या पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे शहरासाठी आवश्यक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. परिणामी, आगामी काही आठवड्यांतील पाणीटंचाईची शक्यता मोठ्या प्रमाणात टळली आहे.
शहराच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन नगरपरिषदेने कुकडी विभागाच्या ६१ क्रमांकाच्या वितरिकेतून हत्तीडोह बंधाऱ्यात पाणी सोडण्याचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर केला होता. प्रस्तावाला गती देण्यासाठी शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत शिरूर शहरासाठी पाणी उपलब्ध करून देण्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला.
या प्रयत्नांना नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे, पाणीपुरवठा सभापती डॉ. सुनिताताई पोटे यांनी प्रभावी समन्वय साधत सहकार्य केले. विविध स्तरांवर केलेल्या समन्वयात्मक प्रयत्नांना यश मिळाल्याने हत्तीडोह बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे. शिरूरकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुढील ४० ते ४५ दिवसांसाठी मार्गी लागला आहे.
बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे, उपनगराध्यक्ष मितेश गादिया, पाणीपुरवठा सभापती डॉ. सुनिता पोटे, महिला व बालकल्याण समिती सभापती आयेशा सय्यद, उपसभापती स्वप्नाली जामदार, नगरसेविका संगीता मल्लाव, नगरसेवक अभिजीत पाचर्णे तसेच नगरपरिषदेचे अधिकारी यांनी हत्तीडोह बंधाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी करून उपलब्ध जलसाठ्याची माहिती घेतली. पाणीपुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेतला.
पाणी काटकसरीने वापरा
मान्सून उशिरा दाखल होण्याची शक्यता लक्षात घेता उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने व जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन शिरूर नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना केले आहे. हत्तीडोह बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे शिरूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता मार्गी लागला असून, उपलब्ध जलसाठा पुढील ४० ते ४५ दिवस पुरणार आहे. पाण्याचा जपून व जबाबदारीने वापर करून नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे, उपनगराध्यक्ष मितेश गादिया, सभापती डॉ. सुनिता पोटे यांनी केले आहे.






