Shirur: शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे ग्रामदैवत तुकाईदेवी यात्रौत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीने ग्रामस्थांचे विशेष आकर्षण वेधून घेतले. १८० बैलगाड्यांची चुरशीची स्पर्धा – बैलगाडा शर्यतीत एकूण १८० बैलगाड्यांनी सहभाग नोंदवला. यात्रा कमिटी अध्यक्ष सचिन ढोमे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटीलबुवा बाळाजी दाभाडे यांच्या बैलगाड्याने ११.१७ सेकंदांची वेळ नोंदवत ‘घाटाचा राजा’ हा मानाचा किताब पटकावला, तर बारकू सखाराम जगताप यांचा बैलगाडा ‘फळीफोड’चा मानकरी ठरला. हेही वाचा – पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचे बिगुल; भोर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींमध्ये 28 एप्रिलला मतदान फळीफोड आणि फायनल शर्यतीचे निकाल – फळीफोड स्पर्धेत बारकू सखाराम जगताप प्रथम, विक्रम बाळासाहेब सैद द्वितीय, सदानंद पुरी तृतीय तर महादू विठोबा सैद चतुर्थ स्थानी राहिले. फायनल शर्यतीत पाटीलबुवा बाळाजी दाभाडे (११.४६), नानापाटील खांडगे (११.६१), वैष्णवी शरद डांगर (११.६६), ज्ञानेश्वर दुर्गा टाकळकर (११.७०) आणि सचिन सूर्यकांत भंडलकर (११.९२) यांनी शर्यतीचा थरार शिगेला पोहोचवला. सर्व बक्षीसपात्र बैलगाडा मालकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल – यात्रेनिमित्त तुकाईदेवी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आली होती. देवीस अभिषेक, मांडव डहाळे आणि पालखी मिरवणूक या धार्मिक विधींमध्ये ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कलगीतुरा, देवीची गाणी आणि आर्केस्ट्राच्या कार्यक्रमांनी यात्रेत उत्साहाची भर पडली. तुकाईदेवी यात्रोत्सव कमिटीच्या अथक परिश्रमामुळे यंदाची यात्रा निर्विघ्नपणे आणि यशस्वीरीत्या पार पडली.