Shirur Panchayat Samiti : शिरूरमध्ये राष्ट्रवादीचा गुलाल! सभापती-उपसभापती निवडणूक बिनविरोध; भाजपने का घेतली माघार?
Shirur Panchayat Samiti : आमदार माऊली कटके आणि ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झाली नावे निश्चित, कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण.

Shirur Panchayat Samiti – शिरूर पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्वाती विठ्ठल घावटे यांची, तर उपसभापतीपदी रामराव सासवडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी व सहाय्यक निवडणूक अधिकारी महेश डोके यांनी सोमवारी (दि. ९) या निवडीची अधिकृत घोषणा केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ अधिक असल्याने आणि भाजपच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे ही प्रक्रिया बिनविरोध पार पडली, ज्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. निवडणूक प्रक्रियेदरम्यान सभापती पदासाठी राष्ट्रवादीकडून स्वाती घावटे तर भाजपकडून मनीषा पाचंगे यांनी अर्ज भरले होते.
उपसभापती पदासाठी राष्ट्रवादीचे रामराव सासवडे आणि भाजपचे सागर देवकर रिंगणात होते. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी माघार घेतल्याने स्वाती घावटे आणि रामराव सासवडे यांचा मार्ग मोकळा झाला. शिरूर पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीकडे आठ सदस्य आणि एका अपक्षाचा पाठिंबा असे एकूण नऊ सदस्यांचे संख्याबळ होते, तर भाजपकडे पाच सदस्य होते.
निवडीपूर्वी आमदार माऊली कटके आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही नावे निश्चित करण्यात आली होती. याप्रसंगी माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, तालुकाध्यक्ष रवी काळे, प्रकाश पवार, शशिकांत दसगुडे, शेखर पाचुंदकर, राहुल पाचर्णे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
निवडीनंतर नवनिर्वाचित सभापती स्वाती घावटे यांनी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि रस्ते, पाणी, आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. उपसभापती रामराव सासवडे यांनीही सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली.





