प्रभात वृत्तसेवा जांबूत – मागील एक महिन्यापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शिवन्या बोंबे, भागुबाई जाधव आणि रोहन बोंबे यांच्या दुःखद घटनांनंतर वनविभागाकडून बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. रोहन बोंबे यांच्या मृत्यूनंतर अलर्ट झालेल्या वनविभागाने ४८ तासांत दोन बिबटे जेरबंद केले, तर नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात यश मिळवले. बुधवारी (दि. २०) रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास पिंपरखेड (ता. शिरूर) येथील पारगाव रोड परिसरात शेतकरी रामहरी बोंबे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात सहा वर्षीय नर संवर्गातील एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले. यापूर्वी मंगळवारी (दि. १८) रोजी रात्री जुन्नर रोड परिसरातील वेताळबाबा वस्तीवर रेस्क्यू टीमने धुमाकूळ घालणाऱ्या एका बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले होते. दोन्ही बिबट्यांना माणिकडोह (जुन्नर) येथील बिबट निवारण केंद्रात नेण्यात आल्याची माहिती सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांनी दिली.पिंपरखेड, काठापूर खुर्द, जांबूत, फाकटे, चांडोह, शरदवाडी, वडनेर खुर्द परिसरात बिबट्यांची संख्या मोठी असून झालेल्या हल्ल्यांची संख्या पाहता वनविभागाकडून विविध भागांत पिंजरे लावण्यात आले आहेत. सध्या ऊस तोडीचा हंगाम सुरू असल्याने बिबट्यांचा मुक्त संचार वाढला आहे. उसाच्या शेतातील त्यांचे वास्तव्य आता मका, ज्वारी यांसह इतर पिकांमध्ये वाढू लागल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. पिंजऱ्यांची संख्या वाढवून बिबट्यांना वेळीच जेरबंद करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे.